12 ‘पाणीदार’ माणसं आणि त्यांचं कर्तृत्व…

April 29, 2016 8:45 PM0 commentsViews:

जागर पाण्याचा या IBN लोकमतच्या विशेष पाणी परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते डॉ.विकास आमटे, नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे, आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्यासह 12 पाणीदार माणसांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये विनायक पाटील,सचिन कोकाटे, अनिल मोहिते, मनीष राजणकर, मधुकर धस,अभिजीत मलगे,प्राजक्ता जगताप, सुरेश खानापूरकर याचाही सहभाग होता. त्यांच्या कार्याचा हा आढावा…

डॉ. विकास आमटे
समाजात उपेक्षित असणार्‍या कुष्ठरोग्यांना माणूसपण देण्यासाठी डॉ. बाबा आमटे यांनी सुरू केलेलं काम विकास आमटे पुढे नेत आहेत. त्या जोडीलाच जलसंधारण चळवळीतलं योगदानही मोठं आहे. पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या आनंदवनात  आपल्या सहकार्‍यांसह स्वत:च्या हातानं विहिरी खोदल्या, तलाव बांधले. विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना नव्यानं आत्मभान देण्यासाठी झरी धामणीतील एका अभिनव प्रकल्पाची पायाभरणी केलीत. कुष्ठरोगी, अंध, अपंग मूकबधीरांना सोबत घेऊन आपण तलाव आणि बंधारे बांधण्याचं काम केलं, हे विशेष. समाजभान अभियानातून पाण्याचा स्रोत वाढवण्यासाठी आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहात.

विनायक पाटील
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातील कवठा या जन्मगावी तीन कोटी लीटरची वॉटर बँक तयार केलीय. विशेष म्हणजे सरकारची एक रुपयाचीही मदत न घेता आपण वॉटरबँकेच्या माध्यमातून स्थानिक शेतकर्‍यांना आणि तहानलेल्या गावांना स्वखर्चानं पाणी उपलब्ध करून देत आहात. येत्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं भीषण पाणीटंचाई असलेल्या लातूरकरांना वॉटरबँकेच्या माध्यमातून पंचवीस लाख लीटर पाणीपुरवठा करणार आहात. याआधी दोन वेळा पाच हजार जनावरांसाठी स्वखर्चानं  चारा छावण्या चालवल्या. या कार्यासाठी विनायक पाटील यांनी स्वत:चं राहतं विकलंय.

सचिन कोकाटे
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शिरला हे सचिन कोकाटे यांच जन्मगाव असलं तरीही आजूबाजूच्या 15 गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी  झटत आहात. या पंधरा गावांना कायमस्वरुपी पाणी मिळावं यासाठी कोकाटे हे सुवर्णा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प लोकसहभागातून राबवत आहात. त्याचा या गावातल्या 43 हजार लोकांना फायदा होणार आहे. हा प्रकल्प येत्या 2 वर्षांत पूर्ण होणार आहे. सोबतच गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण चळवळींमध्ये रचनात्मक काम करत आहात.

अनिल मोहिते
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून काम करताना अहमदनगर जिल्ह्यातल्या पाटेवाडी या मुळगावी नैसर्गिक उतारानं दोन पाझर तलाव जोडण्याचा अभिनव प्रयोग राबवला. हा प्रयोग म्हणजे छोटासा नदीजोड प्रकल्प आणि पश्चिम घाटावरून वाहून जाणारं पाणी महाराष्ट्रात वळवण्याच्या प्रयोगाची छोटी प्रतिकृतीच आहे. जनकल्याण समितीचे सहकारी आणि लोकसहभागातून मोहिते यांनी नगर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये ओढ्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून शाश्वत जलस्रोत विकास कार्यक्रम राबवला.

मनीष रांजणकर
विदर्भातील पारंपरिक पाणीव्यवस्थापन पद्धतींचा गेल्या दोन वर्षांपासून अभ्यास करत आहात. आणि या पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर तलावांची व्यवस्था पुनरुज्जीत करण्यासाठी काम करत आहात. मालगुजारी तलावांच्या संवर्धनासाठी आपण स्थानिक शेतकरी आणि मच्छिमारांच्या मदतीनं रचनात्मक काम करत आहात. सोबतच वैणगंगा नदीखोर्‍यातील पाण्याचं नियोजन आणि व्यवस्थापनात लोकचळवळीच्या माध्यमातून काम करत आहात.

मधुकर धस (दिलासा संस्था)
गेल्या 20 वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यात जलसंधारण आणि जलसंवर्धनाच्या कार्यात स्वत:ला झोकून दिलं. अतिशय कमी खर्चाचं सिंचनाचं मॉडेल तयार करण्याचं श्रेय आपल्याकडे जातं. विदर्भ, मराठवाड्यातल्या कापूस आणि सोयाबीन या पिकांसाठी डोहा मॉडेल, भातपिकासाठी बोडीफड मॉडेल, सर्व प्रकारच्या पिकांसाठी फड मॉडेल आपल्याच पुढाकातून आकारात आलं आहे. आपल्या या कार्यामुळे जवळपास 45 हजार एकरवरची शेती सिंचनाखाली आलीय. सध्या मराठवाड्यातल्या अनेक गावांमध्ये  जलसंधारणाचं मोठं कार्य हाती घेतलंय.

मराठवाडा मित्र परिवार, नवी मुंबई
मराठवाड्यातील पण मुंबई, नवी मुंबई परिसरात राहणार्‍या लोकांनी एकत्र येऊन मराठवाडा मित्र परिवाराची स्थापना केली आहे. शहरांमध्ये राहूनसुद्धा आपल्या गावांशी असलेली नाळ आपण तुटू दिलेली नाहीय. या भीषण दुष्काळी परिस्थितीत मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. मराठवाडा मित्र परिवाराच्या माध्यमातून बीडमधील मयूर अभयारण्यातील मोरांसाठी आणि इतर प्राण्यांसाठी पाणवठे सुरू करण्याचं कार्य आपण केला आहात.

प्राजक्ता जगताप
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या रणदुल्लाबादमध्ये काही संस्थांच्या मदतीनं पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबवला. प्रेरणा महिला संयुक्त समितीच्या अध्यक्षपदी राहून सिमेंटचे बंधारे, नालाबांधचं काम केलं. या संस्थेच्या माध्यमातून गावाचा विकास, महिला विकास आणि शेतीचा विकास आखला गेला. 2008 मध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम हाती घेतली. वर्षभरातच या कामाचा चांगला परिणाम दिसून आला. पोस्ट वॉटर कार्यक्रमांतर्गत नाल्यातील गाळ काढणं, वृक्षारोपणाचं काम जगताप यांनी हाती घेतलंय.

 सुरेश खानापूरकर
शिरपूर पॅटर्नचे जनक अशी आपली ओळख आहे. 2004 पासून आपण जलसंधारणाचं मोठं कार्य हाती घेतलंय. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या 65 गावांमध्ये तब्बल155 बंधार्‍याचं कार्य तडीस नेलं. राज्यातल्या अनेक गावांना दुष्काळाचे चटके बसत असताना शिरपूर तालुक्यातल्या गावांची भूजलपातळी तब्बल 80 टक्के एवढी आहे. अतिशय कमी पावसाचा भाग असूनही पाणी अडवून आणि जिरवून या भागातली शेती आपण चक्क बागायती केलीय. शिरपूर पॅटर्नचा गौरव केवळ राज्यातच नाही तर देशभरात झाला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर बंधार्‍यांचं काम सुरू आहे.

तुकाराम मुंढे
प्रशासनातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून  पाहिलं जातं. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला जलयुक्त शिवार अभियानासाठी गतिमान केलं. त्यामुळेच जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ बनली. कायम दुष्काळग्रस्त असा शिक्का असलेला सोलापूर जिल्हा पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी मुंढेंचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातल्या 335 तलावांतला गाळ काढून नद्या, नाले, ओढे पुन्हा जिवंत करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम आपल्या पुढाकारानं झालं.

डॉ. अविनाश पोळ
व्यवसायानं डेन्टिस्ट असून  गेली 18 वर्षं ग्रामविकासाच्या कामात स्वत:ला झोकून दिलं आहे. सातार्‍याजवळच्या बेबलेवाडी या खेडेगावासून सुरू झालेल्या  कार्याचा आता वटवृक्ष झालाय. स्वत:च्या तालुक्यातील दाखणगाव, वेळू, बिचुकले ही गावं दुष्काळमुक्त करण्यात  यश आलंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या किनगावात पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाणलोटाचं मोठं काम झालंय. अजिंक्यतारा किल्ल्यावर वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचंही काम तडीस नेलं. आपल्या पुढाकारानं अनेक गावांना निर्मलग्राम पुरस्कार मिळालाय.

 सयाजी शिंदे
चित्रपटसृष्टीसारख्या झगमगत्या क्षेत्रात राहूनसुद्धा समाजाप्रती सयाजी यांनी संवेदनशीलता कृतीतून  जपत एक वेगळा आदर्श घालून दिलाय. सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त माण तालुक्यातील दिवडी हे गाव दत्तक घेतलं. आणि मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचं आणि वृक्षलागवडीचं काम सुरू केलं. दुष्काळग्रस्तांनी हात पसरण्यापेक्षा मूठ आवळणं गरजेचं आहे, असा संदेश देत स्थानिक शेतकर्‍यांनीे गमावलेला आत्मविश्वास आपण परत मिळवून दिलात. वावरहिरे, पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी या गावांमध्ये  जलसंधारणाचं काम हाती घेत जलजागृती केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा