संदीप सावंत मारहाण प्रकरण हा शिवसेनेचा राजकीय कट – नारायण राणे

May 2, 2016 8:46 PM0 commentsViews:

narayan rane

चिपळूण – 02 मे : काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांना झालेली मारहाण हे शिवसेनेचे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सोमवारी चिपळूणमध्ये केला. ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांनी मिळून हे षडयंत्र रचलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर संदिपला निलेशने मारहाण केली नाही, अधिकार्‍यांना हाताशी धरून सेनेनं केलेला हा बनाव असल्याचा दावा त्यांनी केला.

रत्नागिरी इथे मराठा आरक्षण मेळाव्याला अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून नीलेश राणे यांनी ही मारहाण केल्याचा आरोप असून, या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून तो चिपळूण पोलीस ठाण्यात वर्ग केला. त्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी चिपळूणमध्ये नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना संदीप सावंत यांची रुग्णालयात जाऊन मी भेट घेतली होती. त्यांच्या अंगावर कुठेही मारहाणीच्या खुणा दिसत नाहीत. त्यांना मुंबईत मारहाण झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. मग त्यांनी ठाण्यामध्ये जाऊन का तक्रार दिली. हे संपूर्ण प्रकरण खोट्या माहितीवर आधारित असून, आपल्या विरोधकांनी कट रचलेले आहे, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, संदीप सावंत यांनी माझ्यावर कुठल्याही अधिकार्‍यानं बनावासाठी दबाव आणला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा