स्वतंत्र विदर्भासाठी मतदान करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – राज ठाकरे

May 2, 2016 9:26 PM0 commentsViews:

raj merjaf

मुंबई – 02 मे :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वेगळ्या विदर्भासाठी मतदान करणारे फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कसे? असा सवाल उपस्थित करत राज यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

फडणवीस यांनी 2013 साली स्वतंत्र विदर्भासाठी झालेल्या जनमत चाचणीत मतदान केल्यानंतर फेसबुकवर पोस्ट केलेली फोटोज राज यांनी पुरावा म्हणून सादर केली. मुख्यमंत्र्यांनी या पुराव्यांवर उत्तर द्यावं, अशी मागणी देखील राज यांनी केली आहे. याशिवाय, श्रीहरी अणे आणि मा.गो.वैद्य हे फडणवीसांच्या इशार्‍यावर बोलतात, असाही आरोप राज यांनी केला.

महाराष्ट्र दिनी हुतात्मा चौकाला सजावट केली जायची. महाराष्ट्र शासन याची संपूर्ण जबाबदारी घेऊन हे स्मारक सजवायचे. मात्र, यंदा या स्मारकावर एक साधं फूलही दिसत नाहीए. ही महाराष्ट्र सराकारसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. याबाबत अद्याप कोणीच दिलगिरी व्यक्त केलेली नाही. शिवसेनेला लाज वाटायला हवी आणि घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागायला हवी, असं राज म्हणाले.

भाजप नेहमीच खोटे बोलत असून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप राज यांनी केला आहे. तसंच सेना-भाजप एकत्र येऊन कंत्राटदारांकडून पैसे खात असल्याचंही ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा