निलेश राणेंना अटक की जामीन?, उद्या होणार फैसला

May 2, 2016 9:59 PM0 commentsViews:

चिपळूण – 02 मे :  काँग्रेस कार्यकर्ता संदीप सावंतला जबरी मारहाण केल्याप्रकरणी अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल झालेल्या निलेश राणेंच्या अटकपूर्व जामीनाची मुदत उद्या संपणार आहे. या प्रकरणी निलेश राणेंनी आज (सोमवारी) चिपळूण पोलीस स्थानकात हजेरी लावावी लागली. या दरम्यान तपास अधिकार्‍यांकडून निलेश राणेंची तब्बल तीन तास चौकशीही करण्यात आली. खेड मधल्या जिल्हा न्यायालयात उद्या याप्रकरणार सुनावणी होणार असून जर जामीन वाढवून मिळाला नाही तर निलेश राणे आणि पर्यायाने नारायण राणेंच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

Narayan rane213

चिपळूण काँग्रेस तालुका प्रमुख संदीप सावंत याचं अपहरण करून त्याला जबरी मारहाण केल्याप्रकरणी नारायण राणेंचे थोरले चिरंजीव निलेश राणेंवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे निलेश राणेनी अटकपूर्व जामीन मिळाला खरा, पण कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना आज (सोमवारी) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तीन तास चिपळूण पोलीस स्थानकात हजेरी लावावी लागली. या दरम्यान त्यांची चौकशीही करण्यात आली. या अटकपूर्व जामीनाची मुदत उद्या संपतीये खेड न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे.

दरम्यान, निलेश राणेना अटक झाली नाही तर आपण आंदोलन उभारू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी दिला आहे.

या सगळ्या प्रकरणामुळे नारायण राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे मुलाच्या बाजूनं धाव घेत राणेंनी ठाण्यामधल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याना टारगेट करत अधिकार्‍यांच्या संगनमताने रचलेला हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी नारायण राणेंचे धाकटे चिरंजीव नितेश राणे यांनाही डंपर आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलीस कोठडीची हवा खावी लागली होती. आता निलेश राणेना अटक झाली तर काँग्रेसमध्ये आधीच बॅकफूटवर गेलेले राणे आणखी बॅकफूटवर जातील अशी शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा