मोहन वाघ यांचे निधन

March 25, 2010 10:07 AM0 commentsViews: 62

25 मार्चज्येष्ठ नाट्यनिर्माते मोहन वाघ यांचे मुंबईत निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. जावई आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवाजीपार्क येथील कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. आता त्यांचे पार्थिव त्यांच्या माहिमच्या मकरंद सोसायटीतील घरी नेण्यात येणार आहे.गुढीपाडव्याच्या आधी दोन दिवस अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते राज ठाकरे यांच्याच घरी होते. छायाचित्रणापासून करिअरची सुरूवात करणारे मोहन वाघ नंतर नेपथ्य, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते म्हणून नावारूपास आले. मोहन वाघ मूळचे कारवारचे. नाटकावर नितांत प्रेम असलेल्या मोहन वाघांनी चंद्रलेखा या आपल्या निर्मितीसंस्थेतर्फे 82 नाटके रंगभूमीवर आणली आहेत. जेजेमधील शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी कॅमेर्‍या ध्यास घेतला. कमाल अमरोहींच्या पाकिजासाठी त्यांना डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मोहन वाघांनी नवख्या कलाकारांना घेऊन केलेल्या ऑल दी बेस्ट नाटकाचे तीन हजारांवर प्रयोग झाले आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर या सध्या मराठी सिनेसृष्टीत गाजणार्‍या नटांना मोहन वाघांनीच ऑल दी बेस्टमधून ब्रेक दिला. त्यांच्या गरूडझेप या नाटकाने मराठी रंगभूमीवर विशेष स्थान निर्माण केले. नाट्यपरिषदेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.

close