नाफेड मार्फत केंद्र सरकार करणार 15 हजार टन कांदा खरेदी

May 4, 2016 6:28 PM0 commentsViews:

Inside An Onion Storehouse As India Prepares To Import Onions As Prices Surge

नवी दिल्ली – 04 मे :  आधीच दुष्काळाने शेतकर्‍याचं कंबरडं मोडले असतानाच देशभरात कांद्याला कवडीमोल भाव मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. मात्र अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीला मोदी सरकार धावून आलं आहे. यंदा देशभरात झालेल्या कांद्याच्या विक्रमी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज (बुधवारी) शेतकर्‍यांकडून 15 हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला.

केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी आज (बुधवारी) लोकसभेत याबाबतची घोषणा केली. विशेष म्हणजे कांद्याचं आगर असलेल्या नाशकातून या खरेदीची सुरुवात झाली आहे.

यंदा महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झालं आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत मोठ्याप्रमाणावर कांदा उपलब्ध आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन 13 लाख टनांनी वाढलं आहे. त्यामुळे बाजारपेठेत कांद्याचे भाव गडगडण्याच्या स्थितीत आहेत. सध्या ठोक बाजारात कांद्याचे दर तीन रुपये किलो आहेत. ज्यामुळं शेतकर्‍याला उत्पादन खर्च सोडा, पण वाहतुकीचा खर्च मिळणेही मुश्कील होतं. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्याच्यादृष्टीने सरकारने शेतकर्‍यांकडून बाजारभावाने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांना थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा