रस्ते घोटाळ्यात काळ्या यादीतील कंत्राटदारांना पुन्हा मिळालं कंत्राट

May 4, 2016 9:19 PM0 commentsViews:

स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई – 04 मे :  पालिकेतील सत्ताधारी सेना भाजप मुंबईकरांना मुर्ख समजतायत की काय? कारण रस्त्यांचा घोटाळा आम्हीच उघड केला असं म्हणणार्‍या या दोन्ही पक्षांनी रस्ते घोटाळा प्रकरणात दोषी असणार्‍यांनाचा आज नव्या कामांच कॉन्ट्रॅक्ट बहाल केलं.

453866-contractors
मुंबईमध्ये रस्त्यांच्या कामात झालेल्या घोटाळ्यांची अनेक वेळा चर्चा झाली. कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं गेलं पण आता पुन्हा दोषी असलेल्या कंत्राटदारांनाच मुंबईतल्या चार पुलांच्या बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलंय. यारी रोड, हँकॉक ब्रिज, धारावीचा मिठी नदीवरचा पूल आणि विक्रोळीतला पूल अशा 4 पुलांचं 227 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट या कंत्राटदारांना देण्यात आलं. स्थायी समितिच्या बैठकीत झालेल्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी सभात्याग केला पण सत्ताधार्‍यांनी मात्र पटापट हे प्रस्ताव मान्य केलं आहे.

रस्त्यांचा घोटाळा उघडकीस यावा म्हणून महापौरांनी आयुक्तांना पत्र लिहिलं. त्यानंतर 1572 कोटींच्या 273 रस्त्यांची चौकशी सुरु झाली असली तरी आतापर्यंत 34 रस्त्यांचीच चौकशी होऊ शकली. यामध्ये मुंबई शहरातले 17, पूर्व उपनगरातले 9 तर पश्चिम उपनगरातल्या 8 रस्त्यांचा समावेश आहे.

अवघ्या 34 रस्त्यांच्या चौकशीसाठी प्रशासनाला जर 7 महिने लागले तर उरलेल्या 239 रस्त्यांचा चौकशी अहवाल यायला किती दिवस लागतील कोण जाणे. या 34 रस्त्यांच्या घोटाळ्यात 6 कंत्राटदार आणि 2 सल्लागार यांना दोषी ठरवत त्यांच्यावर महापालिकेनं गुन्हाही दाखल केला. पण तरीसुद्धा 6 पैकी 2 कंत्राटदारांची टेंडर्स स्वीकारण्यात आली.

घोटाळे झालेल्या रस्त्यांमध्ये सेंट जॉर्ज रोड बरोबरच डॉ.बी.ए. आंबेडकर रोड, वी.बी. वरळीकर मार्ग, जेराबाई वाडीया रोड, चंदनवाडी रोड, सिताराम-पोतदार रोड अशा अनेक मुख्य रस्त्यांचा समावेश आहे. या प्रकरणात शिवसेना भाजप मुंबईकरांचा विश्‍वासघात करतायत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा