ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात लाच कुणाला मिळाली याचा शोध सुरू – पर्रिकर

May 4, 2016 10:42 PM0 commentsViews:

52110688

04 मे : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाला हे निश्चित आहे. मात्र लाच कुणाला मिळाली हा प्रश्न आहे आणि त्याच्याच शोध सीबीआयकडून सुरू आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राज्यसभेत झालेल्या चर्चेवेळी सांगितले.

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात घोटाळा झाला आहे, ही बाब इटलीच्या कोर्टाने देखील मान्य केली आहे. आपल्या देशाला देखील जाणून घ्यायचे आहे की, या भ्रष्टाचारात कोणकोण सहभागी होते, त्यांना कुणाचा पाठिंबा होता आणि या खरेदीत कुणी लाच घेतली? याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी राज्यसभेत यासंदर्भातील चर्चेला उत्तर देताना सांगितलं. तर या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेससह सर्वच विरोधकांनी केली.

या प्रकरणावरून राज्यसभेमध्ये गोंधळाचे वातावरण दिवसभरात अनेकवेळा पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर राष्ट्रीय स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्याचं पडसाद आज (बुधवारी) राज्यसभेतही दिसले. यावेळी चर्चेला उत्तर देताना मनोहर पर्रिकर यांनी भाषण वाचून दाखवल्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतला.

दरम्यान, याआधी सभागृहात सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी देखील तितक्याच जोरदार प्रत्युत्तर दिले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा