वाशिममध्ये अवतरला ‘मांझी’, पाणी भरण्यास नकार दिला म्हणून खोदली विहीर !

May 9, 2016 5:43 PM0 commentsViews:

मनोज जयस्वाल, वाशीम – 09 मे : जगात अशी कोणतीच गोष्ट अशक्य नाही असं म्हणतात…याचा प्रत्यय देणारी घटना वाशीम जिल्ह्यातल्या कलम्बेश्वर इथं घडली. गावातल्या विहिरीवर पाणी घेण्यास नाकरल्यानं एका युवकानं…एकट्यानं विहीर खोदली आणि त्या विहिरीला पाणीही लागलं. जिद्द…परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दगडाला पाझर फोडणार्‍या विदर्भातल्या मांझीची ही प्रेरक कहाणी..washim_

कलम्बेश्वर हे वाशिम जिल्ह्यातलं लहानसं गाव…या गावात राहणार्‍या बापूराव ताजणे या युवकानं किमया केलीये. गावात असलेल्या विहिरीवरून नेहमी पाणी भरायचे… गावातल्या विहिरीचं पाणी कमी झाल्यानं विहीर मालकानं या विहिरीतून पाणी भरायला परवानगी नाकारली. दुष्काळात आता करायचं काय असा प्रश्न बापूरावला पडला. मात्र, आलेल्या संकटापासून पळून न जाता बापूरावने आपल्या घरातल्या अंगणातच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रयत्नांना वेड्यात काढत होते. मात्र, त्यांनी हिंमत न हरता विहीर खोदण्याचं काम सुरू ठेवलं.

बापूरावच्या कुटुंबियांनीही चांगली साथ दिली…तळपतं उन्ह…पैशाचा पत्ता नाही…आणि खोदायला अवघड असलेली जमीन…या सगळ्या अडचणींवर मात करत बापूरावनं विहीर खोदण्याचं काम सुरूच ठेवलं…आणि शेवटी दगडालाही पाझर फुटला. अवघ्या 15 फुटावरचं पाणी लागलं आणि बापूरावच्या श्रमाचं सार्थक झालं.

कलम्बेश्वरच्या या भागीरथासाठी आता मदतीची हातही पुढं येताहेत. तहान लागल्यावर विहीर खोदने ही…म्हणं आहे…पण बापूरावने आपल्या अफाट परिश्रमाच्या जोरावर ही म्हण प्रत्यक्षात खरी करून दाखवलीय…जबर इच्छाशक्ती…कठीण परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर दुष्काळाचा सामना करता येतो हे बापूरावणं दाखवून दिलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा