विदर्भातील नेते बजेटवर नाराज

March 26, 2010 2:07 PM0 commentsViews: 5

विनोद तळेकर, प्रशांत कोरटकर26 मार्च राज्याच्या बजेटमध्ये विदर्भाला भरभरून दिल्याचे सरकारने सांगितले असले तरी विदर्भातील काँग्रेसचे नेते मात्र या बेजट मुळे नाराज आहेत. या बजेटमध्ये नवे काहीच नाही असा सूर ऐकायला मिळत आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या राज्य सरकारने या वर्षाचे बजेट विधिमंडळात मांडले तेंव्हा अर्थमंत्री विदर्भासाठी काही वेगळी घोषणा करतील असे सर्वांनाच वाटत होते. वेगळ्या विदर्भाची मागणी तसेच विदर्भ विकासासाठी दिलेले राज्यपालांचे आदेश याचा अर्थमंत्री विचार करतील, असेही वाटत होते पण तसे झालेच नाही. जुन्याच गोष्टींना नवे नाव देऊन बजेट सादर केल्याचे विदर्भवासियांचे मत आहे. या बजेटमध्ये सिंचनासाठी 3 हजार कोटींचा समावेश आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी 50 हजारापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्वासन बजेटमध्ये देण्यात आले. विदर्भातील अनेक सिंचन प्रकल्प निधी नसल्याने अर्धवट आहेत. त्यामुळे सिंचनाचा बॅकलॉग 42 हजार कोटींवर जाऊन पोहचला आहे.विदर्भावर सतत अन्याय होत असल्याचे कारण सांगून वेगळ्या विदर्भासाठी काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार मैदानात उतरले आहेत. या बजेटमुळे तर त्यांना मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. विदर्भातील रस्ते, उद्योग यांची स्थिती वाईट आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी राज्य सरकारने केंद्राकडे 11 हजार कोटींची मागणी केली होती. राज्यातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावापैकी 15 हजार 400 गावे विदर्भात आहेत. पण या भागासाठी फक्त 240 कोटींची तरतूद केली गेली आहे. केंद्राने दिलेली मदतच राज्याच्या बजेटमध्ये दिसून आली. त्यामुळे दिसायला जरी आकडे मोठे वाटत असले तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे.

close