राजीव गांधी जीवनदायी योजनेवर टीका

March 26, 2010 2:12 PM0 commentsViews: 27

अमेय तिरोडकर 26 मार्चमहाराष्ट्राच्या या वर्षीच्या बजेटमध्ये जाहीर झालेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेवर टीका सुरू झाली आहे. राज्यातील ठराविक जिल्ह्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कुठल्या निकषावर जिल्ह्यांची नेमणूक केली, असा सवाल विरोधक आणि सत्ताधारी आमदारांनी सरकारला विचारला आहे. अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी बजेटमध्ये 250 कोटी रुपयांची नवीन राजीव गांधी जीवनदायी योजना जाहीर केली. हृदयरोग, कॅन्सर, मेंदुची शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, किडनी रोपण शस्त्रक्रिया होणार असलेल्या रुग्णांसाठी ही योजना दिलासादायक ठरणार आहे. ही योजना बीपीएल आणि एपीएल या दोन्ही घटकांसाठी लागू असणार आहे. हेल्थकार्डमार्फत या योजनेत मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री या योजनेचे प्रमुख असणार आहेत. पहिल्या टप्प्यात ही योजना रायगड,जळगाव, सोलापूर, नांदेड, अमरावती, आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांत लागू होणार आहे. अरोग्याच्या योजनांचा लाभ राज्यातील सर्व लोकांना मिळणे अपेक्षित असते. मात्र या नव्या योजनेची व्याप्ती ठराविक जिल्ह्यांपुरती असल्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत सत्ताधारी आमदारांनीही विरोधकांच्या सुरात सुर मिळवून ही योजना राज्यव्यापी करण्याची मागणी केली आहे.या योजनेचा लाभ ठराविक जिल्ह्यांना होणार असल्याने जिल्हे निवडताना सरकारने नेमके काय निकष लावले, असा सवाल आमदार विचारत आहेत. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांना डावलले त्यामागची कारणे काय? असाही प्रश्न आमदारांनी उपस्थित केला आहे.

close