आश्रमशाळा की मृत्युशाळा ?,15 वर्षांत 1,077 मुलांचा मृत्यू

May 10, 2016 8:34 PM0 commentsViews:

 

कौस्तुभ फलटणकर, 10 मे : महाराष्ट्रात आदिवासी आश्रम शाळा आहेत की मृत्युशाळा हा प्रश्न पडावा असं धक्कादायक वास्तव केंद्र सरकारने लोकसभेत मांडलंय. केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री मनसुखभाई वाधवा यांनी लोकसभेत दिलेल्या माहिती नुसार 15 वर्षांत महाराष्ट्रात 1,077 आदिवासी मुलांचा आश्रम शाळेत मृत्यू झाला आहे.adivashi school

हजारो कोटी रुपयाचे अनुदान लाटणार्‍या महाराष्ट्रातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेचे वास्तव खुद्द केंद्र सरकारनेच लोकांसमोर
मांडलंय. देशभरातल्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची लोकसभेत लेखी माहिती देताना सरकारने सांगितलंय की, गेल्या पंधरा वर्षांत महाराष्ट्रात 1077 आदिवासी मुलांचा आश्रमशाळेत मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांचाच विचार केला तर हा आकडा 528 इतका आहे. भूक, औषध न मिळणे, सर्प दंश ही या मृत्यू मागची प्रमुख कारणं सांगण्यात आली आहे. आणि धक्कादायक म्हणजे स्वता:ला पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र देशात अव्वल आहे. सरकारने लोकसभेत दिलेल्या माहिती नुसार 2001 -15 या काळात महाराष्ट्रात 1077 मुलांचे मृत्यू झाले.

आश्रम शाळांचं धक्कादायक वास्तव

ओडिशा 2010 ते 15   : 133 मृत्यू
छत्तीसगड 2001 ते13 : 47 मृत्यू
तेलंगणा 2014 ते 15  : 47 मृत्यू
आंध्र 2001 ते 14       : 14 मृत्यू
गुजरात 2001 ते 13  : 10 मृत्यू

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात झालेले मृत्यु बघून सरकारला या आदिवासी मुलांची काळजी आहे का हा प्रश्न पडतो.

 महाराष्ट्रात आदिवासी मुलांचे मृत्यू
2010 -11: 112
2011-12 : 88
2012-13 : 83
2013-14 : 97
2014-15 : 99

या मुलांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी भाजप खासदारांनी केली आहे. शर्मेची गोष्ट म्हणजे या आश्रमशाळांना सरकारकडून दर वर्षी हजारों कोटींचे अनुदान मिळतं जे पूर्ण खर्च सुद्धा होतं नाही. आयबीएन लोकमत ला मिळालेल्या माहिती नुसार

2011 -12: रु. 3374 कोटींपैकी 2322 कोटी खर्च
2012-13 : रु. 3699 कोटींपैकी 3106 कोटी खर्च
2013 -14: रु. 4000 कोटींपैकी 3041 कोटी खर्च
2014 -15 : रु. 4360 कोटींपैकी 3979 कोटी खर्च

मग प्रश्न आहे की, इतके पैसे मिळुन सुद्धा गरीब आदिवासी मुलांचे मृत्यू का वाढतायेत? एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यात 5 वर्षांत 89 मुलं मृत्युमुखी पडले आहेत. आधीचे आणि आत्ताचे सरकार याची जबाबदारी घेणार का? आणि हे मृत्यू थांबवण्यासाठी गंभीर होणार का हा मोठा प्रश्न आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा