‘असा सिनेमा होणे नव्हे’, ‘नटसम्राट’ला मागे टाकत ‘सैराट’ची 41 कोटींची कमाई

May 10, 2016 10:03 PM0 commentsViews:

10 मे : आर्ची आणि परशाची ग्रामीण लव्ह स्टोरीने अवघ्या महाराष्ट्राला याडं लावलंय. सैराटने आतापर्यंतच्या सर्वच मराठी सिनेमाचे रेकॉर्ड मोडीत काढत अवघ्या 11 दिवसांत 41 कोटींची रगड कमाई केलीये. आतापर्यंत नटसम्राट सिनेमाने 41 कोटींची कमाई केली होती. सैराटने नवा विक्रम रचत 11 दिवसांतच 41 कोटींचा आकडा गाठला आहे.

sairat3नागराज मंजुळे फक्त आता नावचं पुरे…आजवर मराठी सृष्टीत जे घडलं नाही ते नागराज मंजुळे नावाच्या रसायनाने करून दाखवलं. अजय-अतुलचं संगीत आणि अस्सल ग्रामीण लव्ह स्टोरी…आणि दुसर्‍या बाजूला धाडसी आर्ची आणि परशाची जोडी…’असा सिनेमा होणे नव्हे’ असंच आता म्हणावं लागणार आहे. ‘झिंगाट’ होत महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी सैराटला थिएटर भरभरून प्रतिसाद दिलाय.

29 एप्रिलला रिलीज झालेल्या सैराटने पहिल्याच आठवड्यात 25 कोटींची कमाई करत विक्रमी सलामी दिली. दुसर्‍या आठवड्यात 11 व्या दिवशीच हाच आकडा आता 41 कोटींवर पोहोचला आहे. या आधी नाना पाटेकर यांनी प्रमूख भूमिका साकारलेल्या नटसम्राट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सहाव्या आठवड्यापर्यंत 40 कोटींची कमाई केली होती. त्यापाठोपाठ ‘लय भारी’चा क्रमांक लागतो. लय भारीने 35 कोटींची कमाई केली होती. पण, सैराटने दोन्ही सिनेमाला धोबीपछाड देत अवघ्या 11 दिवसांत 41 कोटींची कमाई केली.

एवढंच नाहीतर सैराटला प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद पाहून आगामी मराठी सिनेमांचे निर्माते मात्र घाबरले आहेत. म्हणूनच आगामी तीन सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 13 मे रोजी प्रदर्शित होणारा ‘पैसा पैसा’ आता 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.तर वैभव तत्ववादी आणि पूजा सावंतचा ‘चीटर’ आता थेट 10 जूनला प्रदर्शित होणार आहे. प्रथमेश परबचा ’35 टक्के काठावर पास’ हा सिनेमाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा