कृपाशंकर सिंह यांनी काढले उट्टे

March 26, 2010 2:27 PM0 commentsViews: 1

आशिष जाधव, मुंबई26 मार्चवांद्रे-वरळी सी लींकच्या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन यांना निमंत्रीत करून राष्ट्रवादीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना अडचणीत आणले अशी चर्चा आहे. पण प्रत्यक्षात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनीच मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणल्याची माहिती आता समोर आली आहे. देशातील 'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तीमत्व म्हणजे अमिताभ बच्चन. वांद्रे-वरळी सी लिंकच्या कार्यक्रमाला आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या अदबशीर व्यक्तीमत्वाने मुख्यमंत्र्यासह सर्वच मान्यवर भारावून गेले. पण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर यांनी मात्र अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत राजकीय वाद उकरून काढला. अमिताभ यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव नसताना ते कार्यक्रमाला उपस्थित कसे राहिले, असा सवाल त्यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांना खुलासा करावा लागला.कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना गोतात आणणारी चाल कृपाशंकर सिंह यांनी जाणूनबुजून खेळली. खरच आपण सोनिया गांधींचा रोष तर ओढवून घेतला नाही ना, या चिंतेने मुख्यमंत्री सुद्धा गांगरून गेले.अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अशोक चव्हाण आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करात आहेत. पण काहीही करून मधू कोडा प्रकरणात नाव आलेल्या कृपाशंकर सिंहांना मंत्रिमंडळात घ्यायचे नाही, असे चव्हाणांनी ठरवले आहे. त्यांनी ही बाब अलिकडच्या दिल्ली भेटीत पक्ष श्रेष्ठींना पटवून दिली. त्यामुळे आपले उपद्रवमूल्य दाखवून कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणल्याचे बोलले जात आहे. खरे तर अमिताभ बच्चन यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती, असे आता राष्ट्रवादीनेच स्पष्ट केले आहे.पण यानिमित्ताने काँग्रेसमध्येही शह काटशहाचे राजकारण नव्याने सुरू झाले आहे, हे नक्की.

close