उत्तराखंडमध्ये पुन्हा रावत सरकार, भाजप तोंडघशी

May 11, 2016 1:18 PM0 commentsViews:

harsih_rawat11 मे : उत्तराखंडमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेलं राजकीय नाट्य अखेर संपुष्टात आलंय. भाजपला धक्का देत विश्वासदर्शक ठराव काँग्रेसनं जिंकलाय. ऍटर्नी जनरलनी सुप्रीम कोर्टाला ही माहिती दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा हरीश रावत मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे स्पष्ट आहे.

मंगळवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावात काँग्रेसच्या पारड्यात 33 मतं पडली. विजयासाठी 31 मतं आवश्यक होती. पाच राज्यांच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण तापलेलं असताना उत्तराखंडमध्ये या विजयामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे ठरावाच्या वेळी 9 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यात आलंय. त्यामुळे रावत यांचा मार्ग मोकळा झाला होता. तर या लहानशा राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता उलथवून टाकण्याचा भाजपचा प्रयत्न फसल्याचं मानलं जातंय.

उत्तराखंड घटनाक्रम

18 मार्च : वित्त विधेयकावर मतदान घेण्याची भाजपची मागणी, काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांचा भाजपला पाठिंबा
18 मार्च : विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झाल्याचं विधानसभा अध्यक्षांकडून जाहीर
19 मार्च : राज्यपालांचे मुख्यमंत्री हरीश रावत यांना 28 मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
24 मार्च : उत्तराखंड हायकोर्टाने बंडखोर आमदारांची कारणे दाखवा नोटिसीविरोधातली याचिका फेटाळली
27 मार्च : उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू
27 मार्च : विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या 9 आमदारांना अपात्र ठरवलं
28 मार्च : राष्ट्रपती राजवटीविरोधात रावत यांची हायकोर्टात याचिका
29 मार्च : हायकोर्टाचे 31 मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
30 मार्च : हायकोर्टाच्या आदेशाविरोधात केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका
30 मार्च : सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाची विश्वासदर्शक ठरावाला 7 एप्रिलपर्यंत स्थगिती
21 एप्रिल : हायकोर्टाची राष्ट्रपती राजवटीला स्थगिती
22 एप्रिल : हायकोर्टाच्या आदेशाविरोधात केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका
22 एप्रिल : सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती
6 मे : सुप्रीम कोर्टाचे हरीश रावत यांना 10 मे रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
10 मे : उत्तराखंड विधानसभेत बहुमत चाचणी, निकाल बंद पाकिटात सुप्रीम कोर्टाच्या हवाली
11 मे : सुप्रीम कोर्टात निकाल जाहीर, काँग्रेस विजयी झाल्याचं घोषित


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा