‘शांताबाई’, ‘पिंगा’वर डॉक्टर-कर्मचार्‍यांचा धिंगाणा

May 11, 2016 3:01 PM0 commentsViews:

मुंबई – 11 मे : रुग्णालयाच्या परिसरात नेहमी शांतता ठेवली जाते. पण, माँ हास्पिटलमध्ये डॉक्टर, मेट्रन नर्स आणि नर्सिंग स्टाफने सर्व नियम पायदळी तुडवत डीजे लावून शांताबाई, रिक्षावाला, पिंगा ग बाई पिंगा गाण्यावर ठेका धरत चांगलाच गोंधळ घातला. रुग्णांना तर याचा त्रास सहन करावा लागलाच. पण रोज या रुग्णालयात 700 ते 800 रुग्ण तपासण्यात येतात पण त्या दिवशी 200 ते 300 रुग्ण तपासण्यात आले त्यानंतर बाह्य रुग्ण विभाग बंद करण्यात आला. या कर्मचार्‍यांचा नाचगाण्याचा व्हिडिओ बाहेर आल्यानंतर महापालिका प्रशासन हादरलंय.maa hospital

चेंबूरच्या माँ रुग्णालयातील मेट्रन रतन खर्जे-व्हनमाने, सिस्टर इनचार्ज श्यामल नागवेकर, प्रिया गुप्ते, मंजू मथारु यांनी रुग्णालयात महिलांसाठी भव्य दिव्य हळदीकुंकू समारंभ नुकताच आयोजित केला होता. सकाळी दहा वाजता सुरू होणार्‍या हळदीकुंकू समारंभासाठी पहिल्या मजल्यावरील संपूर्ण बाहय रुग्ण विभाग सकाळपासूनच बंद करुन ठेवला होता. एवढंच नाहीतर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मेट्रन रतन खर्जे -व्हनमाने आणि सिस्टर इनचार्ज श्यामल नागवेकर, प्रिया गुप्ते, मंजू मथारु यांनी शेकडो रुग्णांना “आज माँ रुग्णालयात कोणीही डॉक्टर्स आलेले नाहीत “असं खोटे कारण सांगून सर्व रुग्णांना पुढील उपचारांसाठी खासगी दवाखान्यात पिटाळुन लावलं होतं. सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हळदीकुंकू सोहळ्याचे निमित्त पुढे करुन महिला डॉक्टर आणि स्टाफने दिवसभर रुग्णालयात नाचण्याचा आणि गाण्यांचा धिंगाणा घातला होता. “पिंगा ग पोरी पिंगा, शांताबाई, रिक्षावाला, रेशमाच्या रेघांनी आदी अनेक गाणी कर्णकर्कश आवाजात वाजवून स्टाफने रुग्णालयात सार्वजनिक कार्यस्थळी धुडगुस घातला.

बृहन्मंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील रुग्णालये शांतता क्षेत्राच्या परिसरात असताना देखील तेथिल कामगार कर्मचारी आणि अधिकारीच जर शांततेचा भंग करत असतील तर तो एक गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली असून कारवाई करण्याची मागणी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा