दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या हजारो ऊसतोड कामगारांचं तामिळनाडूत स्थलांतर

May 11, 2016 10:12 PM0 commentsViews:

आशिष दीक्षित, अरियलूर, तामीळनाडू,11 मे : राज्यात दुष्काळ पडलाय. मराठवाड्यात प्यायला पाणी नाहीये. त्यामुळे रोजगार धंदेही ठप्प आहेत. पाणी आणि कामाच्या शोधात अनेक जणं मुंबई-पुण्याची वाट धरतायत. पण आता एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. पाणी आणि काम नाही, म्हणून हजारो ऊसतोड कामगार हजार ते दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून तामीळनाडूपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.

êÖêËêËÖêêpy
तामीळनाडूत निवडणुकीचं वातावरण तापलंय. राजधानीत बड्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवलाय पण हे सगळं सुरू असतानाच दक्षिणेकडच्या राज्यात दुष्काळी मराठवाड्यातले शेतमजूर काम शोधत असल्याची बाब समोर आली आहे.

चेन्नईपासून 300 किलो मिटर दूर असलेल्या अरियलूर जिल्ह्यातल्या नारळ आणि केळीमध्ये लपलेल्या उसाच्या शेतात राबणारे हे हात मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातले आहेत. राज्यात सलग पाऊस कमी झाल्यामुळे उसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या उसाची कापणी फेब्रुवारी महिन्यातच संपली. शेजारच्या कर्नाटक राज्यातही परिस्थिती महाराष्ट्रासारखीच. त्यामुळे आता काय करायचं, असा प्रश्न ऊसतोड कामगार आणि त्यांच्या मुकादमांसमोर उभा ठाकला. अखेर त्यांना कळलं की तामीळनाडूत ऊस आहे, पाणी आहे आणि पैसाही आहे. त्यामुळे आधी शकडो आणि नंतर हजारो कामगारांना घेऊन मुकादम इथे येऊन पोहोचले.

अरियलूर जिल्ह्यातल्या फक्त एका गावात जालना जिल्ह्यातून आलेली 350च्यावर माणसं दिसली. मराठवाड्यातून हजारो कामगार आले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. पण नेमका आकडा सांगता येणं कठीण आहे कारण तामीळनाडूत लॉरीने माणसं आणणं बेकादेशीर आहे. त्यामुळे सरकारदफ्तरी यांची कुठलीही नोंद नाहीये आणि एकत्रित आकडा कुणालाही ठाऊक नाहीये. पण एकूण कामगारांचा आकडा काही हजारांच्या घरात आहे, असं जाणकार सांगतात. जिथे एक थेंब पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं, अशा जालना जिल्ह्यातून आलेल्या कामगारांच्या मुलांना.. इथल्या जलमय वावराचं मोठं अप्रूप वाटतंय. इथे अन्न-पाण्याला ददात नसली. तरी एक वेगळीच समस्या त्यांना त्रास देतेय. इथलं विचित्र हवामान. जालन्यातल्या या मंडळींना उन्हाची सवय आहे.. पण दमट हवामानामुळे येणार्‍या घामाच्या धारा त्यांच्या कामात अडथळा आणतायत आणि त्यांना लवकर थकवतायत.

स्थानिक भाषा येत नसल्यामुळे यांना गावात फिरताना पण अडचणी येतात. पण गावी परत गेलो तर तिथे पाणी नाही आणि रोजगारही नाही. त्यामुळे सगळ्या अडचणींवर मात करून ही शकडो जोडपी दिवसरात्र राबतायत. तीही त्यांच्या घरापासून तब्बल 1200 किलोमीटर दूर. राज्यात दुष्काळ पडल्यामुळे अनेकांनी मुंबई-पुण्यात स्थलांतर केलं आहे. पण या कामगारांचं एवढ्या दूर झालेलं स्थलांतर राज्यातल्या दुष्काळाची दाहकता दाखवतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा