स्टिंग ऑपरेशन : कराचीमध्ये इथं लपून बसलाय दाऊद, हा घ्या पुरावा !

May 12, 2016 12:40 PM0 commentsViews:

कराची – 12 मे : गेली 23 वर्षं भारताला हवा असलेला मोस्ट वाँन्टेड आरोपी दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच राहत असल्याचा पुरावा नेटवर्क 18 च्या हाती लागलाय. नेटवर्क 18 ने पाकिस्तानमधील कराची शहरात दाऊदच्या राहत्या घराबाहेर स्टींग ऑपरेशन केलंय. यात पाकिस्तानची पोलखोल झालीये.

गेल्या 23 वर्षांपासून क्लिफ्टन भागात दाऊदला लपवून ठेवण्यात आलंय. आमच्या टीमनं या भागातल्या महत्त्वाचा लँडमार्क ओलांडलाय. क्लिफ्टन मार्क्यु.. हा या उच्चभ्रू भागातला प्रसिद्ध बँक्वेट आणि लग्नाचा हॉल आहे. सर्वात आधी आम्हाला भेटला दाऊदच्या घराजवळच्या एका बंगल्याचा सुरक्षा रक्षक…dawood_karachi

प्रतिनिधी – सलाम वालेकुम, सर्व काही ठीक?
इदी सेंटर कुठे आहे?
सुरक्षा रक्षक – इथून जवळच आहे.
प्रतिनिधी – दाऊद इब्राहिमचा बंगला कुठे आहे?
सुरक्षा रक्षक – जवळच आहे.
प्रतिनिधी – इथे काही बांधकाम सुरू आहे का? सिमेंटचं काही काम?
सुरक्षा रक्षक -ते मला माहित नाही.

आमच्या टीमनं त्याला दाऊदचं घर विचारलं, तेव्हा कोणतेही आढेवेढे न घेता त्यानं उजवीकडे बोट दाखवलं. दाऊदच्या शेजारी असलेल्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकालाही माहित आहे, हा डॉन कुठे राहतो ते… आमची टीम पुढे गेली, तशी त्यांना बांधकाम सुरू असलेली बिल्डिंग दिसली. पुढे आम्हाला एक म्हातारा नोकर भेटला. तो पुश्तूमधून बोलत होता. त्याच्याशी आमचा असा संवाद झाला.

प्रश्न – बाबा, तुम्ही पुश्तू आहात का?

उत्तर – हो, मी पुश्तू आहे.

प्रश्न – इदी सेंटरजवळ, 4-5 घरं सोडून दाऊद इब्राहिमचं घर आहे का? त्याच्या काँट्रॅक्टरनं आम्हाला पैशांना फसवलंय. त्यानं आमचे 2 लाख रुपये घेतलेत आणि एका वर्षापासून तो फरार आहे. तो दाऊद इब्राहिमच्या घरासाठी काम करतोय असं आम्हाला कोणीतरी सांगितलं.

उत्तर – दाऊदचं घर या रस्त्यावर नाही. ते या रस्त्याच्या मागच्या बाजूला आहे. तुम्ही तिथे जा. तिथे एक मशीद आहे, तुम्हाला तिचा घुमट दिसेल. मशिदीच्या घराजवळ दाऊदचं घर आहे. त्याला गेट नाही. त्याच्या बाहेर बॅरीकेड्स लावलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन विचारा.

प्रश्न – थँक्यू बाबा

मिनिटभरासाठी विचार करा. हा म्हातारा माणूस आहे. तो इथला नाही. तो अफगाणी निर्वासित आहे. त्यालाही माहिती आहे, दाऊद इब्राहिम कुठे राहतो ते…आमची टीम पुढे जात असताना, हा भाग किती धोकादायक आहे हे त्यांनाही जाणवत होते.

आम्हाला तिसरा माणूस भेटला, त्याला दाऊदचं घर नेमकं कुठे आहे ते माहित होतं. त्याचं घर अमुक एका झाडाच्या मागे आहे, तिथं गार्डना विचारा, ते तुम्हाला सांगतील इतकी अचूक माहिती त्यानं आम्हाला दिली.

आणि आम्हाला हवा असलेला पत्ता सापडला. D-13, ब्लॉक 4, क्लिफ्टन, कराची… या गल्लीतून आत गेलं की दाऊदचं घर आहे. अपेक्षेप्रमाणे त्याच्याबाहेर बॅरीकेड्स लावलेले आहेत आणि प्रवेशावर अनेक पदरी सुरक्षा व्यवस्था आहे. पण आमच्या टीमनं तिथल्या सुरक्षा रक्षकांशी संभाषण केलं. ते ऐकलं तर तुम्हालाही धक्का बसेल.

प्रश्न – जनाब, कसं काय? सर्व काही ठीक? हा दाऊद इब्राहिमचा बंगला आहे का?
रक्षक 1 – सर्व ठीक
रक्षक 2 – कुठे जायचंय तुम्हाला?
प्रश्न – सर, एक काँट्रॅक्टर इथं काम करतो. तो दाऊद इब्राहिमच्या बंगल्यामध्ये काम करतो. त्यानं आमच्याकडून पैसे उसने घेतले आहेत.
रक्षक – काय नाव काँट्रॅक्टरचं?
प्रश्न – लतीफ
रक्षक – इथे कोणी लतीफ काँट्रॅक्टर नाही. आतमध्ये कोणीही काँट्रॅक्टर नाही. इथे काहीही काम सुरू नाही. काम सध्या थांबलेलं आहे.
प्रश्न – नाही, तो सध्या दाऊद इब्राहिमच्या बंगल्यावर काम करतो.
रक्षक – तुम्ही हा व्हिडिओ कशासाठी बनवताय?

दोन्ही गार्डपैकी एकानंही हे दाऊदचं घर असल्याचं नाकारलं नाही. उलट त्यापैकी एकजण असं सांगतोय की, बर्‍याच काळापासून इथं कामच सुरू नाहीये.
एकदाही त्यांच्यापैकी कोणी असं म्हणालं नाही की हे दाऊदचं घर नाही, किंवा त्याबद्दल काही माहिती नाही असंही ते म्हणाले नाहीत.
या घराबाहेरचे हे गार्ड्स, शेजारपाजारचे गार्ड, अगदी पुश्तू नोकर… क्लिफ्टन भागातल्या या प्रत्येकाला दाऊद इब्राहिमचं घर माहिती आहे.
गेले 23 वर्षं पाकिस्तान ही बाब नाकारतोय. आता हा दावा खोटा पडलाय. 5 मिनिटं आणि 24 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये हा दावा खोटा पडल्याचं साफ दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा