मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चीट

May 13, 2016 4:19 PM0 commentsViews:

 

13 मे : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला आता चांगलीच कलाटणी मिळाली आहे. एनआयएनं दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पुराव्याअभावी साध्वी प्रज्ञा सिंहचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. पण कर्नल प्रसाद पुरोहितांचं नाव मात्र आरोपपत्रात कायम ठेवण्यात आलं आहे.

Sadhvi Pragya
29 सप्टेंबर 2008… बॉम्बस्फोटानं मालेगाव शहर हादरलं होतं… त्यात 6 जण ठार तर 101जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास करताना तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी सगळे पुरावे जमा करून कोर्टापुढं सादर केले होते. पण आज एनआयएकडून सत्र न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात पुराव्याअभावी या प्रकरणातील एक आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह हिच्यासह सहा जणांची सुटका कोर्टानं केली.

केंद्र सरकारच्या सांगण्यावरून एनआयएनं पुरावं असूनही आरोपींना मोकाट सोडण्याचा कामं केलंय, असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे.

मात्र, एवढं सगळं होऊनही एटीएसनं व्यवस्थित तपास केला नाही, असाच आशय एनआयएनं दाखल केलेल्या आरोपपत्रात पाहायला मिळत आहे. पण आम्ही आमच्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यांनुसारच आरोपपत्र दाखल केलंय, असा दावा एनआयएच्या महानिरीक्षकांनी केला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास आतापर्यंत राजकीय दबावाखालीच चालत होता. मुळात हा खटलाच चुकीचा होता, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी मात्र कायद्याच्या नियमावलीवरच बोट ठेवत पुराव्यांनुसार एनआयएनं आरोपपत्र दाखल केलंय असं म्हटलं आहे.

आतापर्यंत या खटल्याच्या निमित्तानं राजकीय आकसापोटीच कारवाई होत आल्याचा आरोप होत आला होता. पण एका तपास यंत्रणेनं दुसर्‍या तपास यंत्रणेच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं पुन्हा एकदा यातल्या राजकारणाला आता सुरुवात झालीय, असंच दिसतं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा