पावसाळा तोंडावर आला तरी मुंबईत नालेसफाईचा पत्ता नाही!

May 17, 2016 11:22 AM0 commentsViews:

17 मे : यंदा पावसाचं लवकर आगमन होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मे महिना अर्ध्यावर आला, पण नेहमीप्रमाणे याही वर्षी मुंबईतील नालेसफाईची काम पर्ण झालेली नसल्याचं चित्र मुंबईत पहायला मिळत आहे. नालेसफाईच्या कामाने वेग घेतला असून आतापर्यंत 40 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी उपनगरातील बहुसंख्य नाल्याच असल्याचे आढळून आले आहे. पावसाळा तोंडावर आला असताना नालेसफाई पूर्ण न झाल्याने मुंबईतील अनेक भाग जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

NALASAFAI
मुंबईतील नाले म्हणजे अक्षरश: छोटे देवनार कचरा डेपोच झाले आहेत. धारावीतल्या 60 फूट रोडवर असेलल्या नाल्यात गेल्या वर्षीही कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला होता. यावेळी मात्र कहर झालाय, कारण या नाल्याचं नालेसफाईचं शून्य टक्के काम झाल्याचं दिसून येतं आहे. तर मानखुर्द-गोवंडीचा भाग तसा प्रशासनाच्या दृष्टीने कायम दुर्लक्षित राहिला आहे. गोवंडीतल्या नाल्यांची तर वर्षानुवर्ष सफाई होत नाही. या नाल्यांमध्ये प्रचंड कचरा साठला आहे. शिवाय नाल्याच्या आसपास झोपडपट्‌ट्याही आहेत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही नाल्यांमध्ये कचर्‍याचं साम्राज्य आहे. भाजप आणि शिवसेनेच्या चढाओढीच्या राजकारणात या नाल्याची सफाई झालेली नाही. याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे.

पावसाळा तोंडावर आला असतानाही नालेसफाईची कामे पूर्ण झाली नसल्याच्या मुद्द्यावरून महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष प्रशासनाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत असताना, पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीची एकमेकांविरुद्ध गाळफेक सुरू झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा