स्वत:च्या मालकीची जमीन विकली म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत

May 17, 2016 2:10 PM0 commentsViews:

स्वाती लोखंडे-ढोके, पेण – 17 मे  : स्वत:च्या मालकीची जमिन विकल्यानं एका कुटुंबाला वाळीत टाकण्याची घटना राजगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात घडली आहे. जातपंचायतीचे नियम किंवा आंतरजातीय विवाह केल्यानं जातपंचायतीन कुटुंबांना बहिष्कृत करणं हे सर्रास घडताना पाहायला मिळतं. पण पेणमधला हा अजब प्रकार म्हणजे जातपंचायतींच्या लोभी सदस्यांची अरेरावी आहे.

एक अपंग कुटुंब… ज्यांच्या घरात कमावणारं कुणी नाही… म्हणून त्यांनी आपली जमिन विकायची ठरवली. 2011ला जमिनिचा सौदा झाला. पावणे तीन एकरच्या जागेचे त्यांना 16 लाख रुपये मिळाले. पण मराठा जातपचायतीनं या विक्रीला हरकत घेतली. यातली 2 एकर जमीन गावाच्या मालकीची असून 10 लाख रुपयांची जातपंचायतीत जमा करण्यासाठी तगादा लावला.

pen boycott
रघुनाथ पवारांकडे जमिनीची सर्व कागदपत्रं आहेत. जातपंचायतीला एका पैही देणार नाही, असं त्यांनी ठणकावुन सांगितलं. मग काय गावाशी तुझा संबंध नाही आणि तुझ्याकडे कुणी येणार नाही, हा पवित्रा गावानं घेतला. इतकंच काय मंदिरात दर्शनाला गेलेल्या पवार कुटुंबाला प्रसाद देणंही नाकारलं जातं आहे. तरीही देवभोळ्या पवार कुटुंबानं देवाला साकड घातलं आहे. तेही ही टाळं लावलेल्या मंदिराच्या दरवाजावरुनच.

2011 साली नारायण पवारांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न कला होता. तेव्हा पोलिसांनी समजावुन दोन्ही पक्षांना परत पाठवल. पण जातपंचायतीनं त्यांचावरचा बहिष्कार कायम ठेवला. इतकंच काय पण सख्ख्या मोठ्या भावाच्या कुटुंबालाही वाळीत टाकलं.

आताही गावात लग्न आहेत. घरोघरी पानसुपारी देऊन आमंत्रण केलं जातंय. पण पवार कुटुंबाची चार घरं मात्र या सगळ्यातून वगळली जात आहेत. या घरातल्या तीन सुनांना तर अनेकदा परत पाठवलं जातंय. मोठ्याना मानसिक त्रास तर लहानग्यांना आणखी वेगळा होत असला तरी हे नेमकं काय चाललंय ते त्यांना कळत नाही.

गेल्या 5 वर्षांच्या काळात या चार कुटुंबांनी खूप सहन केलं. अखेर जातपंचायतीविरुद्ध कायदा संमत झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. तेव्हा कुठे पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे ज्या 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे, त्यात एक शिक्षकाचाही समावेश आहे.

जमिनीचा व्यवहार पटला नाही म्हणून मुंबईच्या वेशीवर असं सामाजिक बहिष्कार टाकले जात आहे. तर राज्यभरातल्या जातपंचायतींचे गावगुंड काय धुमाकूळ घालत असतील, याची कल्पनाही न केलेली बरी.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा