सांगलीत भावांनी केली कमाल, विहीरीतून हातानं काढला तब्बल 45 फूट गाळ

May 18, 2016 5:36 PM0 commentsViews:

असिफ मुरसल, सांगली
18 मे :   ऐन दुष्काळात, विहीरींमधला गाळ काढण्याचं काम अनेक ठिकाणी हाती घेतलं जातं आहे. अशामध्ये सांगलीत तर दोन भावांनी मिळून बाकी कोणाच्याही मदतीशिवाय महिनाभर गाळ उपसण्याचं काम केलं आहे. विहीरीतला तब्बल 45 फूट गाळ या दोघांनी उपसून काढला आहे.

sangli brothers

दुष्काळाची झळ पोहोचलेला सांगली जिल्हा… पाण्यासाठी अखंड वणवण सुरुच… पण त्यावर काहीतरी उपाय करावाच लागेल… मग सांगली जिल्ह्यातल्या रेठरेधरण इथल्या पंडित पाटील भावांनी विहीरीतला गाळ उपसायचं ठरवलं. त्यांच्या विहीरीतला दहा फूट गाळ त्यांनी कोणत्याही यंत्राशिवाय अविरत मेहनत घेऊन उपसला. स्वत:च्या डोक्यावर वाहून विहीरीबाहेर टाकला. या कामाबद्दल उत्तम आणि हणमंत पाटील या दोन्ही भावडांची गावकर्‍यांनी पाठ थोपटली आहे

उत्तम आणि हणमंत पाटील या दोन भावांनी कष्टाच्या जोरावर शेती फुलवली. एरवी चांगलं पीक निघणार्‍या त्यांच्या जमिनीत यंदा मात्र पायलीभर धान्यही मिळालं नाही. उत्पन्नच नाही त्यामुळे विहीरीतला गाळ यंत्रांच्या सहाय्यानं काढण्यासाठी पैसेच नव्हते. मग त्यांनी स्वत:च गाळ उपसायचा ठरवलं. जनावरांच्या देखभालीची जबाबदारी मुलं आणि घरातल्या महिलांवर सोपवली. पहाटे सहापासून ते दुपारी एकपर्यंत अखंड काम करत रहायचं. त्यानंतर तीन तास विश्रांती घेऊन पुन्हा चार ते संध्याकाळी सातपर्यंत गाळ उपसायचा. एका महिन्यात 14 ट्रॉली गाळ उपसला गेला.

एकूण 28 हजारांचा खर्च या दोन्ही भावडांनी वाचवला असून तब्बल 45 फूट गाळ या विहीरीतला काढला गेला आहे. आता पाऊस पडेल तेव्हा नक्कीच या विहीरीतला गाळाचा अडसर दूर झालेला असेल आणि दुष्काळातलाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा