अकोल्यात पारा 47.1अंश सेल्सिअस वर, मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद

May 18, 2016 10:22 PM0 commentsViews:

18 मे : राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. अकोल्यात बुधवारी विदर्भातील सर्वाधिक 47.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. हे गेल्या पाच वर्षांतील अकोल्यातील सर्वाधिक तापमान आहे. उन्हानं जीवाची काहिली होती आहे पण आणखी काही दिवस उन्हाचा हा कडाका असाच कायम राहणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

आगामी दिवसांतही विदर्भाचा पारा चढताच राहणार असून पुढील 48 तासांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान 47 अंशाच्यावर पोहचेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. याशिवाय, आज नागपूरातही 44.1 तर धुळ्यात 45.6 इतक्या तापमानाची नोंद झाली. आज दिवसभरात नागपूरमध्ये तिघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

summer-main1
ओस पडलेले रस्ते, रस्त्यावरून जाणारं अगदी एखादं वाहन, असलीच तर एखाद्या झाडाच्या खाली किंवा थंड पेयांच्या गाडीभोवती झालेली अशी दोन-चार माणसं. विदर्भात सध्या सगळीकडे हे चित्र दिसतं आहे. कर्फ्यू लागल्यासारखी या परिस्थितीमागचं कारण आहे प्रचंड उन्हाळा. कडाक्याचं ऊन हा शब्दही कमी पडेल असं वातावरण सध्या मराठवाडा, विदर्भात आहे. काहिलीनं नागरिकांचा जीव अक्षरश: तळमळतोय. कोल्यात तर आज विक्रमी 47 अंश तापमान नोंदवलं गेला आहे. अकोल्यासारखीच परिस्थिती वर्धा, यवतमाळ, नापूरमध्येही आहे.

इतकी कडाक्याची उष्णतेची लाट आहे की हवामान खात्यानं विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केलाय. अगदी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर या ऑरेंज अलर्टच्या काळात नागरिकांनी काय करावं आणि काय करु नये हेही सांगण्यात आलं आहे. सगळी कामं उन्हाच्या आत उरकण्याचं, जास्त जास्त पाणी पिण्याचं, डोक्याला रुमाल, टोपी असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?
– अचानक उष्णता वाढण्याची शक्यता
– या दरम्यान तापमान 43.1 ते 46.8 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता
सकाळी 11 ते दुपारी 4 या काळात उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला

मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. पण आपल्याकडे मान्सून यायला आणखी 12-13 दिवस लागणार आहेत. तोपर्यंत सूर्य आणखी किती तापणार आणि आणखी किती काहिली सहन करावी लागणार हाच नागरिकांना प्रश्न आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा