पोलिसांचा गाव लोंढरी खुर्द

March 27, 2010 11:15 AM0 commentsViews: 14

प्रशांत बाग, जळगाव27 मार्चजळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात हे एक ध्येयवेडे गाव आहे. त्याचे नाव लोंढरी खुर्द. या गावाला एक 'नाद' आहे. आणि तो म्हणजे पोलिसांत भरती होण्याचा. पोलीस होऊन दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करण्याचा जणू गावाने वसाच घेतला आहे. लोंढरी खुर्द हे अवघ्या 70 घरांची वस्ती असलेले एक लहानसे गाव आहे. या गावातील जवळपास प्रत्येकाकडे जरी शेती असली तरी अख्ख्या गावाला आकर्षण आहे ते पोलिसी वर्दीचे. गावाची लोकसंख्या आहे 300. आणि यातील 165 गावकरी आज पोलीस दलात काम करत आहेत. कॉन्स्टेबल ते अधिक्षकापर्यंतच्या विविध पदांवर ते कार्यरत आहेत. निवृत्तीनंतरही या गावातील कर्मचारी गावातील तरुणांना पोलीस भरतीसाठी तयार करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस दलात या गावातील एक तरी तरूण आहे. गावात व्यायामशाळा नसल्याने या कसरतीसाठी जागा म्हणजे, गावचा पार. दंड, बैठकांचा पारंपरिक व्यायाम करायचा आणि पोलीस भरतीच्या तयारीला लागायचे हा या गावातील युवकांचा प्रमुख उद्योग. आता या गावाला वेध लागले आहेत ते एमपीएससी परिक्षेचे.सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत पोलीस भरती सुरू आहे. आणि याही भरतीत आमची निवड होणार असा विश्वास गावातील तरुणांना आहे. कारण पोलिसाची नोकरी करणे ही फक्त परंपराच नाही तर आपले कर्तव्य आहे, अशी ठाम भावना या तरुणांची आहे.

close