यावर्षी ‘नीट’मधून सुटका, केंद्र सरकारने काढला अध्यादेश

May 20, 2016 6:51 PM0 commentsViews:

नवी दिल्ली – 20 मे : नीट परीक्षेमुळे धास्तावलेल्या विद्यार्थ्यांना अखेर केंद्र सरकारने दिलासा दिलाय. यावर्षी नीट परीक्षा आता होणार नाही. केंद्र सरकारने अध्यादेश काढला असून सुप्रीम कोर्टाचा निर्णय वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलाय. सरकारी अनुदानित खाजगी महाविद्यालयांना हा अध्यादेश लागू होणार आहे. परंतु, खाजगी महाविद्यालयांना नीट कायम असणार आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता हा अध्यादेश राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय.

CM and modio213मेडिकल प्रवेशासाठी नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा सुप्रीम कोर्टाने या वर्षापासून लागू केली. 1 मे रोजी नीटची पहिला परीक्षा पार पडली आणि दुसर्‍या टप्प्यात 24 जुलै परीक्षा होणार होती. मात्र, नीट परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी पुढे आली. विद्यार्थी आणि पालकांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. एवढंच नाहीतर 9 राज्यांनी नीट सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय कायम ठेवत याचिका फेटाळून लावली. अखेरीस नीटचा पेपर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी भेट घेऊन नीट परीक्षा 2 वर्षांसाठी पुढे ढकलावी अशी विनंती केली होती. अखेरीस आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नीट परीक्षा पुढे ढकलण्यासाठी अध्यादेश काढण्यात आला. या अध्यादेशानुसार सुप्रीम कोर्टाचा निर्णय वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलाय. हा अध्यादेश फक्त सरकारी अनुदानित खाजगी महाविद्यालयांना लागू होणार आहे. तर या अध्यादेशातून खाजगी महाविद्यालयांना वगळण्यात आलंय. त्यामुळे खाजगी महाविद्यालयांना नीटनुसारच परीक्षा द्यावी लागणार आहे. केंद्राने अध्यादेश काढल्याबद्दल राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा