दर गडगडल्यानं कांदा बाजारात पोचवण्यासाठी शेतकर्‍यालाच करावी लागतेय पदरमोड!

May 20, 2016 8:46 PM0 commentsViews:

अमित मोडक, मंगेश चिवटे, मुंबई
20 मे :  आमदनी अठन्नी आणि खर्च रुपया या म्हणीची प्रचिती सध्या राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतक-यांना येत आहे..उत्पादन खर्च सुद्धा हातात पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.. सोलापुर जिल्हयातील करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 गोणी पोती कांदा विकण्यास गेलेल्या दिलिप मुरूमकर या शेतक-याच्या कांद्याला प्रति किलो 50 पैसे इतका कमी भाव मिळालाय. यावरूनच कांदा उत्पादक शेतक-याचं दाहक वास्तव लक्षात येतंय.

Onion farmer213

कांदा चार रुपये किलोवर आला आहे. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. कुठे रस्त्यावर कांदे फेकलेत तर कुठे उलटून लावले कांद्याचे ट्रक पण हा फक्त संताप नाही, कारण कांदा विकण्यापेक्षा रस्त्यावर फेकलेला परवडेल अशी म्हणायची वेळ आली आहे. कांदा विकण्यासाठी त्याला खिशातून द्यावं लागत आहे.

करमाळ्याचे शेतकरी दिलीप मुरुमकर यांनी 446 किलो कांदा विकल्यावर त्यांना मिळाले फक्त 231 रुपये. म्हणजे एका किलोमागे मिळाले फक्त 50 पैसे. ही थट्टा नाही तर वस्तुस्थिती आहे. पण खरी गमंततर पुढे आहे. 231 रुपयेही त्यांच्या खिशात नाही गेले कारण त्यातही आहेत 6 भागीदार.

आडत – 11 रुपये
हमाली – 22 रूपये
वाराई – 16 रुपये
तोलाई – 6 रूपये
गाडी भाडे – 150 रूपये
प्रतवारी – 1 रुपये

म्हणजे 208 रुपये गेल्यावर मुरुमकरांच्या हाती आले फक्त 13 रुपये पण हा फेरा इथेच संपत नाही. कारण मुरुमकर यांना कांदा आणण्यासाठी गोण्यांचा खर्च आला 160 रुपये म्हणजे 446 किलो कांदा विकण्यासाठी मुरुमकरांना खिशातून 137 रुपये द्यावे लागलेत.

फक्त करमाळाच नाही तर राज्यातल्या कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री साठी गेलेल्या शेतकर्‍याच्या पदरी अशीच निराशा पडत आहे. कांद्याने शेतकर्‍यांच्या डोळ्यांत अक्षरश: पाणी आणलं आहे. हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांची ही हदयद्रावक कहाणी आजपर्यंतच्या राज्यकर्त्याच्या धोरणाचं संचित आहे. शेतकर्‍याने वर्षभर घेतलेली मेहनत. निसर्गाचा लहरीपणा, दलालांची दादागिरी, बाजार समित्यांची मनमानी, सरकारी अनास्था आणि त्याचा बळी म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी. 446 किलो कांदा आणि मेहनतीची किंमते उणे 137 रुपये.आता तुम्हीच सांगा बळीराजा कसं जगायच?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा