इस्रोनं रचला इतिहास, स्वदेशी बनावटीच्या ‘स्पेस शटल’चं यशस्वी प्रक्षेपण

May 23, 2016 9:41 AM0 commentsViews:

Reusable Launch Vehicle

22 मे : भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं आज आणखी एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीचं आणि पुनर्वापरायोग्य असलेलं पहिलं अंतराळयान (स्पेस शटल) आरएलव्ही-टीडी (रियूजेबल लाँच व्हेइकल-टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर) आज सकाळी श्रीहरीकोटा येथील तळावरून यशस्वीपणे अवकाशात झेपावलं आणि इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

विशेष म्हणजे, आरएलव्ही-टीडी यान (रियूजेबल लाँच व्हेइकल-टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर) पुनर्वापर करण्याच्या क्षमतेचे आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून सोडलेलं अवकाश यान उपग्रहाला पृथ्वीभोवतीच्या कक्षेमध्ये ठेवेल, आणि ते पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. त्यामुळे अंतराळयानाच्या निर्मितीचा खर्च दहा पटीने कमी म्हणजे दोन हजार अमेरिकी डॉलर प्रति किलो एवढा होणार आहे. अशा प्रकारे आत्तापर्यंत फक्त अमेरिका आणि रशियाचचं प्रक्षेपण यशस्वी ठरलं आहे. त्यामुळे भारतासाठी ही कामगिरी अतिशय महत्त्वाची समजली जातेय. यासाठी सॉलिड रॉकेट मोटरचा वापर करण्यात आला. 9 मीटर लांबीच्या या रॉकेटचं वजन 11 टन इतकं होतं.

कसं आहे स्पेस शटल?

- RLV-TD हे फेरवापर होऊ शकणारं स्पेस शटल
– पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर
– आवाजापेक्षा पाच पट जास्त वेग, 70 किमी उंचीवरून करणार उड्डाण
– पृथ्वीच्या कक्षेत उपग्रहाला सोडणं, आणि पुन्हा वातावरणात परत येणं हा मुख्य उद्देश
– या प्रयोगामुळं उपग्रह प्रक्षेपणाच्या खर्चात 10 टक्के कपात
– आतापर्यंत फक्त अमेरिका आणि रशियाकडेच तंत्रज्ञान
– गेल्या 5 वर्षांपासून सुरू होतं या प्रयोगावर काम


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा