दाऊद फोन कॉल प्रकरणी खडसेंनी दिलेल्या माहितीबाबत चौकशी सुरू

May 25, 2016 8:22 PM0 commentsViews:

25 मे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या घरी कथीत फोन कॉल प्रकरणावरुन राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे चांगलेच वादग्रस्त झाले आहे. हे पूर्ण प्रकरण बनावट असल्याचा दावा वारंवार खडसे यांनी केला असला तरी दररोज नवनवीन येणार्‍या पुराव्यांनी हा विषय गंभीर झालाय. खडसे सातत्यानं खुलासा जरी करीत असले तरी अनेक प्रश्न मात्र आजही अनुत्तरीत आहे.

menoon_khadseदाऊद इब्राहिम कासकर … अंडरवर्ल्डचा काळा चेहरा… हा डॉन अजूनही…भारतातील आपले लागेबंधे अजूनही टिकवून आहे. आणि यात काही राजकारणीही असल्याचं बोललं जातंय. दाऊदच्या कराचीमधल्या घरच्या लॅण्ड लाईनवरून भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्या मोबाईलवर अनेक वेळा फोन केल्याची माहिती आम आदमी पक्षानं पुढं आणल्यानं खळबळ उडालीय. खडसेंनी सर्व आरोप फेटाळून लावलेत.

गुजरातमधला हॅकर मनीष भंगाळेनं पाकिस्तान टेलीकॉमची वेबसाईट हॅक करून मेहेजबीन शेख या दाऊदच्या पत्नीच्या नावे असलेल्या फोन कॉल्सचा सीडीआर बाहेर काढलाय. त्यावरून खडसेंना फोन गेल्याची माहिती आहे. प्रकर गंभीर असल्यानं मुंबई पोलिसांनीही
तातडीनं तपास करून हा फोन वर्षभरापासून बंद असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता आणखी काही नवीन माहिती मिळाल्यानं मुंबई पोलिस तपास करत आहे अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिलीय.

राज्यातल्या राजकारणात दाऊदच्या नावारून अनेकदा खळबळ उडालीय. हे प्रकरण संवेदनशील असल्यानं कसून तपास करून माहिती स्पष्ट करणं हे आव्हान ठरणार आहे.

काही अनुत्तरीत प्रश्न

- महिनाभरापूर्वीच प्रकरण पुढं आले असताना एकनाथ खडसेंनी खुलासा करण्यास वेळ का लावला?
– दाऊदच्या प्रत्येक हालचालीवर गुप्तचर यंत्रणांची करडी नजर असते, याबद्दलची माहिती आयबी मुंबई पोलिसांना देणार का?
– पाकिस्तानच्या टेलिकॉम कंपन्यांची जी माहिती हॅकर्सनी बाहेर काढली त्यात खडसेंचाच नंबर नेमका का आला?
– प्रकरण अतिशय गंभीर आणि संशय वाढवणारं असल्यानं गुप्तचर संस्था प्रकरणाचा सखोल तपास करून प्रकरणाचं गुढ उकलणार का ?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा