चंद्रपुरच्या जंगलात तरुणाईची श्रमसंस्कार छावणी

May 25, 2016 10:58 PM0 commentsViews:

महेश तिवारी,चंद्रपूर – 25 मे : स्वर्गीय बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या मुळ तालुक्यात सोमनाथच्या जंगलात युवाशक्तीच्या अंतरात्म्याला साद घालण्यासाठी आणि त्यांच्यात समाजासाठी श्रम करण्याची भावना तयार होण्यासाठी एक छावणी उभारली. त्या छावणीचे नाव होत श्रमसंस्कार छावणी. गेल्या 49 वर्षांपासून ही छावणी भरत असून यावर्षी तर राज्याच्या 33 जिल्ह्यातून आलेल्या 550 तरुण-तरुणीसह देशाच्या इतर भागातूनही अनेकांनी उपस्थिती लावलीय.

chandrapurरणरणत्या उन्हात हातात कुदळ, फावडं, पहारी आणि घमेले घेऊन हे सर्व जण कामाला लागलेत.. दगडमाती खोदून दगडी बंधारा बांधण्याचं काम इथं सुरू आहे. त्यासाठी या मोठमोठाल्या दगडांशी त्यांची झुंज सुरू आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरातले आणि देशाच्या इतर भागातले सुमारे साडेपाचशे तरुण-तरुणी सोमनाथच्या जंगलातल्या छावणीत दाखल झालेत.

पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत या छावणीतला उत्साह ओसंडून वाहत असतो. रोज पाच तास श्रमदान केलं जातं आणि त्यानंतर याठिकाणी होतं वेगवेगळ्या वक्त्यांकडून मार्गदर्शन…श्रमदानासोबतच या शिबिरात कला आणि संस्कृतीची देवाणघेवाणही होते.

बाबा आमटेंनी 1967 मध्ये मे महिन्यातल्या रणरणत्या उन्हात चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल जवळच्या सोमनाथच्या जंगलात पहिली श्रमसंस्कार छावणी सुरू केली. सुरुवातीला देशभरातून पंधराशे तरुण तरुणींचा जत्था याठिकाणी दाखल झाला. यातूनच पुढे भारत जोडो अभियान, राष्ट्रीय सेवा योजना अशा चळवळींची पायाभरणी झाली.

बाबा आमटे यांनी अमर्याद श्रमातून जीवनाची आशा सोडलेल्या कुष्ठरुग्णांना सोबत घेऊन आनंदवन उभारलं. तेव्हाच युवाशक्तीचा समाजाच्या रचनात्मक कार्यासाठी कामी येईल या उद्देशानं ही श्रमसंस्कार छावणीही सुरू केली. ती आज तरुणाईचं भविष्य घडवणार व्यासपीठ बनलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा