मोदी सरकारची दोन वर्षं; खरचं आले का ‘अच्छे दिन’ ?

May 26, 2016 12:45 PM0 commentsViews:

कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली

26 मे  :  मोदी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मोदी सरकार किती यशस्वी झालं? दोन वर्षात सरकारनं नेमकं काय साध्य केलं आहे.

Swearing-in ceremony of NDA government
26 मे 2014 रोजी शंभर कोटी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. निवडणुकीच्या केलेल्या आश्वासनांची खैरात आणि विकासाचं वचन मोदी कसं पूर्ण करणार हा प्रश्न अजूनही सर्वसामान्यांच्या मनात कायम आहे. सरकारची दोन वर्ष स्थिरतेची गेली असली तरी, दरम्यानच्या चर्चेच्या केंद्रस्थानी मोदीच कायम राहिले. दरम्यान, देशात वेगवेगळ्या विषयावर वादही झाले. शिवाय मोदींचा परदेशात दौर्‍यात झालेला जयजयकारही चर्चेत राहिला. केंद्रातल्या मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मोदींवर टीकेचा भडीमारही झाला. स्वच्छ भारत अभियानामधून झाडू हातात घेऊन मोदींनी नागरिकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. भू संपादन विधेयकावरून सरकारची मोठी फजिती झाली. त्याचबरोबर बांग्लादेश सोबतचा सीमावाद सोडवून सरकारनं प्रगल्भताही दाखवली.

लोकसभेत मोदींकडे एकहाती बहुमत असलं तरी, राज्यसभेत अजूनही सरकारची बाजू लंगडी आहे. त्यामुळं भू संपादन आणि जीएसटी सारखे विधेयक अजूनही मंजूर होऊ शकले नाहीत. परिणामी सरकार आर्थिक सुधारणांचा वेग वाढवू शकले नाहीत. शिवाय महागाईचा चढउतार ही सरकारची मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. याच मुद्यावरून काँग्रेस म्हणते की सरकार अपयशी ठरलंय.

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारकडे आता फक्त 3 वर्ष शिल्लक आहेत. सरकारच्या महत्वाकांक्षी योजना पूर्ण करणं आणि लोकभावना सरकारच्या बाजूनं राखणं यावर मात्र त्यांची कसरत होईल.

मोदींसाठी 2019 च्या लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन पुढच्या वर्षीपासून सुरू होणार आहे. लोकसभेची उपांत्यफेरी समजली जाणारी उत्तरप्रदेशसह भाजप शासित राज्यांची होणारी विधानसभेची निवडणूक हीच काय मोदींच्या दोन वर्षांच्या कारभाराची शिदोरी राहणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा