आता फळांपासून मद्यनिर्मिती

March 29, 2010 10:45 AM0 commentsViews: 6

29 मार्चधान्यापासून मद्यनिर्मितीच्या निर्णयानंतर आता फळांपासून मद्यनिर्मिती करण्याचा सरकारचा विचार आहे. चिकू, जांभूळ, आणि काजू बोंडापासून मद्य निर्मितीचे प्रस्ताव आले आहेत. त्यावर सरकार विचार करत आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिली. धान्यापासून मद्यनिर्मितीचे काय झाले? असा प्रश्न विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला राष्ट्रवादीचे अरूण गुजराथी यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना नाईक यांनी हे स्पष्ट केले. राज्यात सध्या पुरेशी मद्यनिर्मिती होत आहे. त्यामुळे सरकारने 20 ऑगस्टपासून धान्यापासून मद्यनिर्मितीचे परवाने देणे बंद केले आहे. त्याचवेळी आलेल्या प्रस्तांवानुसार फळांपासून मद्यनिर्मिती करण्याचा सरकारचा विचार आहे, असे नाईक यांनी सांगितले. मात्र सरकारच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कठोर टीका केली आहे. तरूण पिढीला व्यसनात लोटणारा हा मद्यनिर्मितीचा निर्णय सरकार का घेत आहे? शिवाय एकदा परवाने देऊन ते रद्द करण्याचा द्रविडी प्राणायाम सरकार का करते आहे? गरिबांचे संसार धुळीला मिळवण्याचा हा निर्णय सरकार टाळू शकत नाही का? असे सवाल अण्णांनी यानिमित्ताने सरकारला विचारले आहेत. त्याच वेळी फळांपासून काही पौष्टीक पदार्थ बनवा, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच आता याबाबत आपण जनजागृती करणार आहोत, असेही ते म्हणाले.

close