दलित वस्तीचा पाणीपुरवठा बंद करणार्‍या उपसरपंचाला अखेर अटक

May 30, 2016 1:57 PM0 commentsViews:

नांदेड -30 मे : दलित महिलेच्या स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्य घेणार नाही अशी जातीयवादी भूमिका घेत उपसरपंच आणि त्याच्या सहकार्‍यांनी महिला आणि तिच्या कुटुंबीयाना भरचौकात बेदम मारहाण करुन गावातून हाकलून दिलंय. नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील लोणी या गावात हा प्रकार घडला. एवढच नाहीतर दलित वस्तीचं पाणीच बंद करण्यात आलं होतं. अखेर या प्रकरणाची पोलिसांना जाग आली असून उपसरपंच दादाराव मानेला अटक करण्यात आलीये.nanded3

लोणी गावातले उपसरपंच दादाराव माने यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना होता. दुकानाविरोधात तक्रारी वाढल्यानं त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आणि तो इंदिरा बचत गटाला देण्यात आला. संगाबाई भास्करे या दलित समाजातल्या महिलेला तो परवाना मिळाला. माने यांनी या महिलेला मारहाण केली. दुकानातून उच्चवर्णीय समाजाच्या लोकांनी धान्य घेऊ नये, असा तथाकथित फर्माही काढला.

या प्रकरणी भास्करे यांनी पोलिसांत तक्रार केली. याचा राग मनात धरून माने यांनी अख्ख्या दलित भागाचा पाणीपुरवठाच बंद केला. टँकरर्सनाही तिथे जाऊ दिलं जात नाहीय. भर उन्हाळ्यात 24 मे पासून या वस्तीचा पाणीपुरवठा बंद आहे. एवढंच नाही, तर गावात पाय ठेवलात तर जीवे मारू, अशी धमकीही मानेनं भास्करेंना दिलीये.

त्यामुळे या परिवारात एवढी भीती आहे की त्यांनी आतासाठी गाव सोडलं आणि ते तेलंगणाच्या हेडगोली गावात राहायला गेलेत. एवढं होऊनसुद्धा पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. अखेर या प्रकरणाला आयबीएन लोकमतने वाचा फोडल्यानंतर पोलिसांनी सर्व 12 आरोपीना मरखेल पोलिसांनी अटक केलीये. तसंच प्रशासनाने
दलित वस्तीत दोन टँकरने पाणी पुरवठा केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा