वर्ध्यात लष्करी दारूगोळा भांडारात स्फोट, 17 जण मृत्युमुखी

May 31, 2016 10:02 AM0 commentsViews:

वर्धा – 31 मे : वर्ध्यातील पूलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात स्फोट झाल्यामुळे लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झालाय.
या दुर्घटनेत 15 जवान आणि 2 लष्करी अधिकार्‍यांचा समावेश आहे. 19 जण यात जखमी झाले आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

भारतीय लष्कराच्या पूलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात आज पहाटे 2 ते 2.30 त्या सुमारास स्फोट झाला. स्फोटामुळे आग पसरली. या आगीची तीव्रता इतकी होती की, कॅम्प परिसरालगतच्या 15 कि.मी. परिघातील गावांतील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. या भांडारात प्रचंड क्षमतेच्या बॉम्बचे स्फोट होत असल्याने आगीच्या ज्वाळा देवळी तालुका मुख्यालयातूनही दिसत आहेत. कॅम्प परिसरालगतच्या नागझरी भागाला आग लागली असून इंझाळा, पिपरी, आगरगाव, मुरदगावासह सुमारे 15 गावांतील नागरिक देवळीच्या दिशेने धाव घेतली.wardha

याबाबतची माहिती तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांना देण्यात आली असून देवळी येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आलीये. शिवाय डेपो परिसरातील गावं खाली करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. डेपो परिसरालगतच्या झाडाझुडपांना सोमवारी अचानक आग लागली ही बाब वेळीच कुणाच्याही लक्षात न आल्याने आगीने भीषण रुप धारण केले. हीच आग डेपो परिसरात पसरल्याने घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने आयबीएन लोकमतला सांगितलं.

घटनेची माहिती मिळताच पुलगाव शहरातही एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासन, लष्कर आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे.  खबरदारी म्हणून आजूबाजूच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. या स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी भेट देणार आहे.

लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग पुलगावसाठी रवाना झाले आहेत. ते घटनास्थळी जाऊन आढावा घेणार आहेत. आज दुपारी ते पुलगावला पोहोचतील. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर वर्ध्यात जाऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं. “पुलगावमध्ये दारूगोळा डेपोला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीमुळे मी दु:खी आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मला सहानुभूती वाटते. या आगीत जखमी झालेल्यांना लवकर बरं वाटावं अशी मी प्रार्थना करतो. मनोहर पर्रिकर यांना घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यायला सांगितलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा