रक्तदान की ‘एचआयव्हीदान’?, 2 हजारांहून जास्त रुग्णांना एचआयव्ही संसर्ग !

May 31, 2016 12:34 PM0 commentsViews:

दिनेश मौर्य, मुंबई – 31 मे : रक्तदान हे सर्वात महत्त्वाचं दान आहे असं म्हणतात..पण हेच रक्तदान मृत्यूचा संदेश घेऊन आलं तर काय कराल..ऐकायला विचित्र वाटतंय. पण देशभरात असे दोन हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत. ज्यांना रक्तदानातून एचआयव्हीचा संसर्ग झाला. आरटीआयअंतर्गत मिळालेल्या या माहितीमुळे आरोग्यक्षेत्रात खळबळ उडालीय. काहीच चूक नसताना अनेकांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार आहे. याबद्दलचा हा धक्कादायक रिपोर्ट…blood_donat

एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा ऑपरेशनसाठी आपल्याला रक्ताची गरज असेल तर सावधान…कारण जे रक्त आपल्याला दिलं जाईल ते रोगमुक्त असेलच याची खात्री देता येत नाही…रक्तात एचआयव्ही असेल तर…आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी केंद्रीय आरोग्य विभागाकडून गेल्या दोन वर्षांत रक्तदानातून झालेल्या एचआयव्ही संसर्गाची माहिती मागितली होती. आणि यावर सरकारकडून जे उत्तर आलं ते ऐकून आपल्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही..आरटीआयच्या माहितीनुसार देशभरात रक्तदानातून तब्बल 2 हजार 234 एचआयव्ही संसर्गाच्या घटना समोर आल्यात.

यात उत्तर प्रदेशात सर्वाधिक – 361
गुजरात – 292
महाराष्ट्र – 276
दिल्ली – 264
पश्चिम बंगाल – 135
कर्नाटक – 127
हरियाणा – 99
बिहार – 91
तामिळनाडू – 89
पंजाब – 88

ही आकडेवारी काही राज्यांची आहे. देशातल्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये रक्तदानातून असे धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय.

साधारणत: रक्तदानाच्या वेळी जमा झालेलं रक्त ब्लडबँक म्हणजे रक्तपेढीत जमा केलं जातं. नियमानुसार त्या रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. आणि त्यात सर्वात महत्त्वाची चाचणी असते एचआयव्हीची…बहुतांशी रक्तपेढ्यांत रक्ताच्या सगळ्या चाचण्या केल्या जातात. पण काही वेळा काही मोजक्याच चाचण्या करून किंवा त्या न करताच गरजू रुग्णाला रक्त दिलं जातं. तज्ज्ञांच्या मतानुसार रक्तात एचआयव्ही व्हायरस सक्रीय होण्यासाठी 48 ते 72 तास लागतात. त्यामुळे ताबडतोब त्याचं निदान करणं कठीण आहे. आता आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीमुळे महाराष्ट्र सरकार खडबडून जागं झालंय. आणि सरकारनं या प्रकारच्या चौकशीचे आदेश दिलेत.

निष्काळजीपणामुळे आणि नकळत केलेल्या या रक्तदानातून देशभरातल्या जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आज मृत्यूशी झुंज देतायत..त्यांची काहीच चूक नसताना त्यांना कुणीतरी मृत्यूच्या दारात ढकललंय.

जीवघेणं रक्तदान

- जमा झालेलं रक्त रक्तपेढीत जमा केलं जातं
- नियमानुसार रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात
- सर्वात महत्त्वाची चाचणी एचआयव्हीची
- बहुतांशी रक्तपेढ्यांत रक्ताच्या सर्व चाचण्या केल्या जातात
- पण काहीवेळा त्या न करताच गरजूंना रक्त दिलं
- रक्तात एचआयव्ही व्हायरस 48 ते 72 तासात सक्रिय होतो


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा