अर्जुनची निवड योग्यच, अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रणव धनावडे

June 1, 2016 4:15 PM0 commentsViews:

Pranav and arjun1

01 जून : अर्जुन तेंडुलकरच्या निवडीवरुन सोशलकल्लोळावर खुद्द प्रणव प्रणव धनावडेनं स्पष्ट खुलासा केलाय. अर्जुन तेंडुलकरची निवड योग्यच आहे आणि अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनच प्रणव धनावडेने केलंय.

सध्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स्‌अप सर्व सोशल मीडियावर ‘प्रणव धनावडे एकलव्य, तर अर्जुन तेंडुलकर आधुनिक युगातला ‘अर्जुन’ असं म्हणणारी एक पोस्ट फिरत आहे. या पोस्टमागचं कारण म्हणजे प्रणव धनावडे याला डावलून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन याची निवड केल्याचं म्हटलं जात आहे.

यावरुन गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्याने या निवडीबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. पण यावर प्रणव आणि त्याच्या वडिलांनी सोशल मीडियावर फिरणार्‍या या पोस्टला आता पूर्णविराम दिला आहे. अर्जुन तेंडुलकरची निवड योग्य असल्याचं सांगत असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

सोशल मीडियावर ज्यांनी कोणी माझ्यावर अन्याय झाल्याची बातमी पसरवली आहे. ती ही अर्धवट आणि चुकीची माहिती आहे. ज्यावेळी मी 1 हजार धावाचा विश्वविक्रम केला होता त्यापूर्वीच अर्जूनची मुंबईच्या अंडर 16 टीमची निवड झाली होती. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याचा प्रश्नच नाही, असं प्रणव म्हणाला. तर प्रणवच्या वडिलांनीही या घटनेचा निषेध केला आहे. या अशा चुकीच्या गोष्टी पसरवल्यामुळे दोन्ही मुलांच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ शकतो, असं प्रणवचे वडील म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा