मुख्यमंत्री दिल्लीला जाणार, खडसेंचा ‘निरोप’ घेऊन येणार ?

June 2, 2016 10:29 AM0 commentsViews:

02 जून : महसूल मंत्री एकनाथ खडसे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. त्यामुळे खडसेंचं मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन खडसेंच्या प्रकरणावर चर्चा करणार आहे. त्यामुळे मोदी सरकार आता काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

cm meet pm_khadseएमआयडीसी भूखंड प्रकरण, कथित पीए गजानन पाटील लाच प्रकरण, जावायाची बेकायदेशीर लिमोझीन कार आणि भरात भर दाऊद इब्राहिम कॉल प्रकरणामुळे एकनाथ खडसे चांगलेच गोत्यात सापडले आहे. एकीकडे मोदी सरकार दुसरी वर्षपूर्ती साजरी करत आहे. दुसरीकडे त्यांच्या एका मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्यामुळे पंतप्रधानांची डोकेदुखी वाढलीये. तीन दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून थेट मुक्ताईनगर गाठलं. दोन दिवसांत खडसेंनी लाल दिव्याची गाडीही वापरली नाही. एवढंच नाहीतर समर्थकांनी खडसेंच्या बचावसाठी राजीनामास्त्र उपसले आहे. या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत. या भेटीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असून त्यात भेटीत खडसे प्रकरणावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही राज्याच्या नेत्यांकडून खडसेंवरच्या आरोपांबाबत तपशीलवार माहिती घेतली आहे. त्यामुळे दिल्लीतून मुख्यमंत्र्यांना काय संदेश दिला जातो याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा