राजीनाम्याचा प्रश्नच नाही पण पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य राहिल-खडसे

June 2, 2016 3:09 PM0 commentsViews:

जळगाव – 02 जून : मी कोणतीही चूक केली नाही, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्न नाही. पण पक्षश्रेष्ठीने काही निर्णय दिला तर तो मला मान्य राहिलं असं स्पष्टीकरण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलंय. एकनाथ खडसे यांनी आयबीएन लोकमतशी खास बातचीत केली आणि आपल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

khadse333वादाच्या भोवर्‍यात सापडलेले एकनाथ खडसे सध्या जळगावमध्ये आपल्या गावी मुक्ताईनगरला मुक्कामी आहे. दुसरीकडे खडसेंचं मंत्रिपद जाणार अशी चर्चा सुरू आहे. या सर्व वादावर आयबीएन लोकमतकडे एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलंय. मी कोणतीही चूक केली नाही. त्यामुळे घाबरुन जाण्यासारखं काहीही नाही. मला कुणी राजीनामा मागितला नाही आणि मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाहीये असं खडसेंनी स्पष्ट केलं.

लालदिव्याची गाडी न वापरण्यावरही खडसेंनी खुलासा केला. पाठीच्या आजारामुळे मला त्या गाडीत बसण्यास अडचण येत आहे. त्यामुळे साध्या गाडीतून प्रवास करतो. जळगाव जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतोय. माझं काम सुरळीत सुरू आहे. मी मंत्रिमंडळाच्या कामात सक्रिय आहे. उद्यापासून मी विदर्भाच्या दौर्‍यावर जाणार आहे. दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या दौर्‍यात आपण सामिल होणार असल्याचंही खडसेंनी सांगितलं.

तसंच मला दिल्लीतून कुणी बोलावलं नाही. मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाहीये. कोणत्या उद्दिष्टाने हे सुरू आहे. कुणी हेतू पुरस्कृत हे करत असले तर त्याला मी काही करू शकत नाही. खरंतर मुळात जनतेला सर्व काही माहिती आहे. उद्या जर पक्षश्रेष्ठींना काही दोषी आढळलं तर त्यांचा निर्णय मला मान्य राहिल शेवटी मी भाजपचा कार्यकर्ता आहे असंही खडसेंनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा