आझाद मैदानात दमानिया आणि खडसेंचे समर्थक येणार आमने-सामने

June 2, 2016 3:04 PM0 commentsViews:

damania khadse1231

02 जून : एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं आहे. दमानिया यांनी खडसेंच्या विरोधात 17 प्रकरणामधले पुरावे दिले होते. यानंतरही मुख्यमंत्र्यांनी खडसेंवर कारवाई केली नाही. म्हणून त्या आझाद मैदानावर उपोषण करतायेत.

आम्हाला खडसेंचा केवळ राजीनामा नकोय. तर लवकरात लवकर आणि निश्चित कालावधीत त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. हीच आमची मागणी आहे, असं अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं आहे.

याआधी त्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषणाला बसणार होत्या. पण पोलिसांनी त्यांना यासाठी परवानगी नाकारली आणि आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याची सूचना केल्याचं दमानियांनी म्हटलंय. पण याचवेळी आझाद मैदानावर खडसे समर्थकांनी सुद्धा सभेसाठी मंडप बांधला आहे. त्यामुळे दमानिया आणि खडसे समर्थक आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी राळेगणसिद्धीत जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खडसेंवरील आरोप प्रकरणी अण्णांशी चर्चा केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा