‪एकनाथ खडसे‬ यांचा अखेर राजीनामा

June 4, 2016 1:03 PM0 commentsViews:

Khadse resign banner213

04 जून :   गेल्या अनेक दिवसांपासून विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन आपल्या सर्व पदांचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा वर्षा बंगल्यावर उपस्थित होते.

आज सकाळी देवगिरी या निवासस्थानावरुन खडसे एकटेच वर्षाकडे निघाले, तेव्हा त्यांच्या गाडीवरील लाल दिवा झाकलेला होता. त्यामुळे खडसे राजीनामा देणार हे निश्चित होतं. खडसेंनी आपल्याकडे असलेल्या महसूल कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडली आहेत.

मागच्या काही दिवसापासून खडसेंवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे विरोधी पक्ष त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री दिल्लीहून परतल्यामुळे खडसे यांच्या या भेटीला महत्व आलं होतं. तसंच खडसे हे झाकलेल्या लाल दिव्याच्या गाडीने निघाले होते. त्यामुळे आज ते मुख्यमंत्र्याकडे राजीनामा देतील असा अंदाज सर्वत्र वर्तविण्यात येत होता. अखेर त्यांनी स्वत:हून मुख्यमंत्र्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा