रायगडमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू

March 30, 2010 9:24 AM0 commentsViews: 1

मोहन जाधव, अलिबाग30 मार्चसीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणार्‍या उद्योगपतींच्या बेकायदा बांधकामांवर रायगड जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. यशबिर्ला ग्रुपचे यशोवर्धन बिर्ला आणि ग्लोबल ग्रुपचे मनोज तिरोडकर यांची बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात आणखी काही उद्योजकांच्या बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाई केली जाणार आहे. समुद्र किनार्‍याला लागून आपलेही घर असावे, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. या मोहापासून उद्योगपती कसे सुटणार? देशातील दिग्गज उद्योगपतींपैकी काहींनी अलिबाग समुद्र किनार्‍यावर त्यासाठी जागाही खरेदी केल्यात. आपल्याला हवे तसे आलिशान बंगले बांधताना मात्र त्यांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात काही दिवसांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली.त्यानुसार अशा बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिलेत.विशेष म्हणजे यात यशोवर्धन बिर्ला आणि मनोज तिरोडकर यांच्यासारख्या बड्या उद्योजकांच्या बेकायदेशीर घरांवरही कारवाई केली गेली आहे. पण ही कारवाई फक्त नावापुरतीच केली जातेय असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणारे हे लोक बडे उद्योजक आहेत. त्यामुळे ही कारवाई स्थगित करावी म्हणून स्थानिक प्रशासनावर राजकीय दबाव असल्याची माहीती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. आणि म्हणूनच स्थानिक प्रशासन हातचे राखून कारवाई करत आहे का? असा प्रश्न उभा राहिला आहे.

close