निर्दोषत्त्व सिद्ध होईपर्यंत पदभार स्विकारणार नाही – एकनाथ खडसे

June 4, 2016 3:25 PM0 commentsViews:

04 जून :   माझ्यावरील आरोप तथ्यहीन असून, केवळ भाजपच्या आजवरच्या नैतिक मुल्यांच्या परंपरेचे पालन करण्यासाठी मी हा राजीनामा देत आहे. या सर्व आरोपांची चौकशी होऊन माझे निर्दोषत्त्व सिद्ध होईपर्यंत मी पदभार स्विकारणार नसल्याचेही भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.

दाऊदच्या घरातून फोन कॉल, एमआयडीसीची भूखंड खरेदी, सिंचन घोटाळ्यातील आरोप आणि गजानन पाटील लाच प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या खडसेंनी आपल्या महसूलमंत्रिपदासह अन्य पदांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला. त्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील सर्व आरोप निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले.

khadse07B

आणीबाणीच्या काळापासून मी भाजपात सक्रिय आहे. मी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आहे. या कालखंडात अनेक चढउतार पाहिले. 40 वर्षे संघर्ष करत याठिकाणी पोहोचलो. कधी सत्तेत, तर कधी विरोधी पक्षात काम केलं. मात्र, असा मीडिया ट्रायलचा प्रयोग अनुभवला नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केले. प्रसारमाध्यांमध्ये दिशाभूल करणारे आणि बेछूट आरोप करून माझे 40 वर्षांचे राजकीय जीवन उद्‌ध्वस्त करू पाहणार्‍यांचा पर्दाफाश करेन, असा ठाम निर्धार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीत कोणताही बेकायदा व्यवहार नाही. सर्व नियमानुसारच आहे, याकडे लक्ष वेधतानाच आपण मंत्रिपदाच्या काळात शेतकर्‍यांबाबत 119 निर्णय घेतले. त्याचा अनेकांना फटका बसला. त्यातून काहीजण दुखावले असतील. त्यामुळे माझी प्रतिमा डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी मंडळी समोर आली पाहिजेत. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, चौकशीचीही मागणी केली आहे. जोपर्यंत मी निर्दो सिद्ध होत नाहीत, तोवर पदावर येणार नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

माझ्यावर अलीकडे बरेच आरोप झाले. मात्र, आरोप करणार्‍यांनी आत्तातापर्यंत यासंदर्भात कोणतेही पुरावे दिले नाहीत. पुरावे दिले, तर मी राजकारण सोडून देईन, असं आव्हान दिलं होतं.

पक्ष खडसेंच्या पाठीशी – दानवे

या पत्रकार परिषदेत दानवे यांनी पक्ष खडसे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं सांगितलं आहे. भाजपाच्या नैतिक परंपरेला अनुसरून त्यांनी राजीनामा दिल्याचं दानवेंनी सांगितल आहे. एवढच नाही तर पक्षाला बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर आरोप होत असल्याचंही दानवे म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा