स्पेशल रिपोर्ट : पृथ्वीवरुन एक समुद्रचं गायब !

June 5, 2016 4:58 PM0 commentsViews:

आरती कुलकर्णी, 05 जून : आज जागतिक पर्यावरण दिन आहे. अवघं जग तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या संकटांना सामोरं जातंय. पण पर्यावरणाच्या र्‍हासाला आपण तितकेच कारणीभूत आहोत. मध्य आशियामधला एक समुद्र… अरल समुद्र गायब झालाय. समुद्र कसा काय गायब होऊ शकतो..असं तुम्हाला वाटलं असेल. पण असं झालंय. याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट

aral_sea2असं म्हणतात….समुद्राच्या लाटा अविरत खळाळत राहतात…अनेक नद्यांना सामावून घेत समुद्र उचंबळत राहतो..पण हाच समुद्र जर गायब झाला तर.. ? ही एखाद्या विज्ञानकथेतली कल्पना नाहीये. खरोखरच एक समुद्र पृथ्वीवरून गायब झालाय. मध्य आशियामधला अरल समुद्र पूर्णपणे कोरडा पडलाय आणि पृथ्वीवरचं हे सर्वात मोठं मानवाने निर्माण केलेलं हे सर्वात भयाकारी असं पर्यावरण संकट आहे.

हा अरल समुद्र आहे…मध्य आशियातल्या कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये. खरंतर आहे म्हणण्यापेक्षाही हा समुद्र होता, असंच म्हणावं लागेल. आता या समुद्राचं वाळवंट झालंय. गेल्या काही वर्षातल्या या समुद्राच्या प्रतिमांवर नजर टाकली तर आपल्याला सहज येईल… हा समुद्र आपण कशा प्रकारे गमावून बसलोय.aral_sea4

याआधी कझाकीस्तान, उझबेकीस्तान आणि तुर्कमेनिस्तान या भागातल्या सिर दर्या आणि अमु दर्या या नद्या या समुद्राला येऊन मिळायच्या. या प्रवाहांमुळे या समुद्राचा 68 हजार चौ. किमीचा पाणपसारा होता. पण 1960 साली सोव्हिएट रशियाने सिंचन प्रकल्पांसाठी या नद्यांचं पाणी वळवलं. त्यामुळे या समुद्राचा पाणीपुरवठाच खंडित झाला आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण समुद्रच आकसून गेला. 2014 मध्ये नासाने प्रसिद्ध केलेल्या या अरल समुद्राच्या प्रतिमा बघा. या समुद्राचा उत्तरेकडचा भाग थोडा वाचलाय. पण बाकी सगळा भाग कोरडाठाक आहे.

आपल्याकडे मान्सूनचं चक्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरच अवलंबून आहे. या समुद्राला होणारा नद्यांचा पाणीपुरवठाच गायब झाला तर.. ? ही कल्पना केल्यानंतर आपल्याला या समुद्राचं गायब होणं किती भयावह आहे हे समजू शकतं.

अरल समुद्र हा कॅस्पियन आणि भूमध्य समुद्रासारखाच होता. पण भुमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराला जोडलेला आहे. पण कॅस्पियन आणि अरल समुद्र मात्र लँडलॉक आहेत. त्यांच्या सभोवती जमीन आहे. त्यामुळे अरल समुद्राचा पाणीपुरवठा फक्त नद्यांवर
अवलंबून होता.

aral_seaसमुद्रच गायब झाल्याने इथली बेटं उघडी पडली…मच्छिमारी पूर्ण नष्ट झाली..आणि त्यावर अवलंबून असलेलं किनार्‍यावरचं संपूर्ण जीवनही संपलं.

समुद्रावर अवलंबून असलेलं इथलं हवामानाचं चक्रही बिघडलंय. हिवाळा जास्त कोरडा झालाय आणि उन्हाळ्याची तीव्रताही वाढलीय.

संपूर्ण मध्य आशियाला या पर्यावरणीय संकटाचे भोग भोगावे लागणार आहेत. ज्या नद्या आपल्या जीवनदायिनी आहेत त्याच नद्यांचे प्रवाह मनमानीपणे वळवल्यानंतर किती भयंकर परिणाम होऊ शकतात..याचं अरल समुद्र हे जितंजागतं उदाहरण आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा