घाटकोपरमध्ये पाईपलाईन फुटली; पाण्याच्या प्रवाहामुळे वाहनं गेली वाहून

June 9, 2016 9:47 AM0 commentsViews:

09 जून :  घाटकोपर इथल्या असल्फा परिसरातील 72 इंची व्यासाची जलवाहिनी फुटल्याने बुधवारी रात्री एकच खळबळ उडाली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये लोकांच्या घरात पाणी घुसल्याने एकच हाहाकार माजला.

जमिनीच्या 10 फूट खाली असलेली पाईपलाईन फुटली तेव्हा जोरात आवाज झाला. पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता की 40 ते 50 फुट उंच पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. तर रात्रीच्यावेळी घरात पाणी शिरल्याने स्थानिक रहिवाशीही तारांबळ उडाली होती. लोकांच्या घरातही पाणी शिरलं होतं. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. अनेकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.

Ghatkopar water

मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा कर्मचारी पवई येथील जलवाहिनीचा मुख्य पाणीपुरवठा बंद करण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरू होणार होतं. रात्री उशीरा फुटलेल्या पाईपलाईनचा व्हॉल्व जोडण्यात आता यश आलं असलं तरी ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.

दरम्यान, पाईपलाईन फुटल्याने पुढील तीन ते चार दिवस या परिसरातील नागरिकांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा