‘बॉम्बे टू गोवा’ चालत मग ‘उडता पंजाब’ का नाही ?, कोर्टाने सेन्सॉर बोर्डाला फटकारलं

June 9, 2016 8:20 PM0 commentsViews:

09 जून : बॉम्बे टू गोवा, गो गोवा गॉन अशी नावं जर चालत असतील तर उडता पंजाब हे नाव का चालणार नाही असा प्रश्न हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला विचारला. ‘उडता पंजाब’ या सिनेमाच्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर आज (गुरुवारी)सुनावणी झाली. ही सुनावणी आज तहकूब झाली असून उद्या पुन्हा या विषयावर युक्तीवाद केला जाणार आहे.udta-punjab-poster

उडता पंजाब या सिनेमाचं नाव बदलण्यासंदर्भात, त्यातून पंजाब शहराचा उल्लेख काढण्यासंदर्भात आणि 89 कट्स सेन्सॉर बोर्डानं सुचवले होते. या बदलांना पहिल्यापासून निर्मात्यांचा विरोध होता. निर्माता अनुराग कश्यप यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

आज न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला त्यांच्या या सिनेमाच्या नावावर आक्षेप घेतल्याबद्दल चांगलंच सुनावलंय. बॉम्बे टू गोवा, गो गोवा गॉन अशी नावं जर चालत असतील तर उडता पंजाब हे नाव का चालणार नाही असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाला विचारला. त्यासोबतच एखाद्या शहराचं राज्याचं नाव सिनेमात घेतल्यामुळे त्याच्या अस्मितेला नक्की कसा काय धक्का लागतो असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायालयाने उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर सेन्सॉरचे वकील योग्य युक्तीवाद करू शकले नाहीत. याशिवाय सेन्सॉरने या सिनेमावर उपस्थित केलेल्या 13 मुद्यांबाबतही नीट स्पष्टीकरण देण्याची मागणी न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाच्या वकिलांकडे केलीय. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता उद्या होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा