खडसेंनी केलेल्या बदल्या होणार रद्द! फेरतपासणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

June 10, 2016 10:11 AM0 commentsViews:

devendra-fadnavis-with-eknath-khadse_650x400_41463937569

10 जून :  एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्री पदाचा राजीनामा देण्याआधी 110 अधिकार्‍यांच्या केलेल्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (गुरुवारी) रद्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. एवढंच नाही तर खडसेंनी घाई घाईत घेतलेल्या काही संशयास्पद निर्णयांच्या फाइलींची पुन्हा छाननी सुरू करण्यात आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

एमआयडीसी भूखंड प्रकरण, कथित स्वीय सहाय्यक गजानन पाटील लाच प्रकरण, दाऊद दूरध्वनी प्रकरण, जावयाच्या लिमोझिन गाडीचे प्रकरण अशा काही प्रकरणांमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने खडसे यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

पण खडसे यांच्यावर चौफेर आरोप होत असतानाच त्यांनी उपजिल्हाधिकारी आणि तहसिलदार अशा सुमारे 110 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला. खडसेंच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे गेला. महसूलमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी खडसे यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. ही फाइल आता मुख्यमंत्र्यासमोर आली तेव्हा नियमानुसार नागरी सेवा मंडळाची मान्यता न घेताच या बदल्या केल्याचे निदर्शनास आलं.

नव्या कायद्यानुसार नागरी सेवा मंडळाच्या मान्यतेशिवाय बदल्या करता येत नाहीत. खडसेंनी मात्र या मंडळाला डावलून आपल्या मर्जीने या बदल्या केल्या होत्या. मुख्यमंत्र्यानी या फाइलवर सही करण्यास नकार देत आधी नागरी सेवा मंडळाची मान्यता घ्या, असे आदेश विभागास दिले. अशाचप्रकारे खडसे यांनी घेतलेल्या आणखी काही वादग्रस्त निर्णयांची फेरतपासणी करण्याच्याही हालचाली मुख्यमंत्री कार्यालयात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खडसे यांचे आणखी काही प्रताप बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा