खैरलांजी प्रकरणी कोर्टाचे सीबीआयवर ताशेरे

March 31, 2010 8:56 AM0 commentsViews: 8

31 मार्चखैरलांजी हत्याकांडासारख्या गंभीर घटनेचा तपास करताना, सीबीआयने घटनास्थळाचा पंचनामा का केला नाही, असा जाब नागपूर खंडपीठाने सीबीआयला विचारला आहे. सीआयडीकडून हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यामुळे सीबीआयसारख्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने गांभीर्याने तपास करणे आवश्यक आहे, असे मतही कोर्टाने नोंदवले आहे. सीबीआयला कोर्टाच्या या प्रश्नावर समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. माणुसकीला काळीमा फासणार्‍या खैरलांजी हत्याकांडाचा खटला आता मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर आला आहे. या खटल्यावर भंडारा जिल्हा कोर्टाने निकाल दिला होता. या घटनेचा तपास सीबीआय करत आहे. 29 सप्टेंबर 2006 ला खैरलांजी या गावातील काही लोकांनी भैय्यालाल भोतमांगे यांची पत्नी सुरेखा, मुलगी प्रियंका, मुलगा रोशन आणि सुधीर यांची क्रूरपणे हत्या केली होती. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले होते. भंडार्‍याच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने यातील सहा आरोपींना फाशी, तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यातील सर्वांना फाशी द्यावी यासाठी सीबीआय प्रयत्न करत आहे. तसेच आरोपींवर ऍट्रॉसिटी ऍक्टखाली कारवाई करावी, यासाठी सीबीआयने कोर्टाला विनंतीही केली आहे. नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती ए. पी. लंवादे आणि न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी सुरू झाली आहे.

close