दिघावासियांचं एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर ठिय्या

June 11, 2016 4:45 PM0 commentsViews:

11 जून : दिघा येथील रहिवास्यांनी आज ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरावर मोर्चा काढला आणि घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं. एकनाथ शिंदे कामानिमित्त बाहेर असताना दिघ्यातील नागरिकांनी जोपर्यंत पालकमंत्री भेटत नाही तोपर्यंत आमचे ठिय्या आंदोलन सुरु राहील असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.shinde_home_digha

कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला असून शिवसैनिक ही या भागात मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला पण आंदोलन करणार्‍या दिघावासियांनी जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण आंदोलनात दिघावसियांसोबत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आणि विद्या चव्हाण यांचे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. सेना कार्यकर्त्यांनी गणेश नाईक आणि संजीव नाईक यांच्या विरोधात घोषणा दिल्या तर दिघावासीय आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणा दिल्यात. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या घराबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा