हिंदूत्ववादी संघटनांना चपराक, अखेर महालक्ष्मीचा प्रसाद कैदी बनवणार !

June 14, 2016 9:41 AM0 commentsViews:

कोल्हापूर-14 जून : महाराष्ट्राच्या समाजजीवनातील एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आज उचललं जातंय. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद बनवण्याचं काम आजपासून कोल्हापूर जेलमधील महिला आणि पुरूष कैद्यांकडून करून घेतलं जाणार आहे. कैदी महिलांनी लाडू तयार केला तर त्याचं पावित्र्य राहणार नाही अशी वकिली काही हिंदूत्ववादी संघटनांनी केली होता पण जिल्हाधिकार्‍यांनी विरोध झुगारून अखेर या निर्णयाची अंमलबजावणी केलीये.

mahalaxmi_prasadकोल्हापूरमध्ये देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दररोज मंदिरात येत असतात. त्यांना प्रसाद म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून 5 रुपयांमध्ये लाडूचा प्रसाद दिला जातो. पण देवस्थान समितीसमोर अध्यक्ष म्हणजेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांनी हाच लाडूचा प्रसाद महिला कैद्यांकडून तयार करुन घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये सध्या 70 महिला कैदी आहेत. याच महिलांना देवस्थान समिती साहित्य पुरवणार असून त्यांच्याकडून लाडूचा प्रसाद बनवून घेणार आहे.

कैदी महिलांनी प्रसाद केल्यामुळे त्या प्रसादाचं पावित्र्य जपलं जाणार नाही असा आरोप हिंदूत्ववादी संघटनांनी केलाय. यापूर्वीही याच लाडू प्रसादाबाबत ठेकेदाराकडून योग्य पुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, आता याच प्रकरणावरुन प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यात वाद पेटला होता.

अखेर कोल्हापूर कारागृहाच्या अधिक्षक आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं कैद्यांनीही स्वागत केलंय. इतर बाबींपेक्षाही समाजाने आपल्याला स्विकारल्याची भावना त्यांना जास्त समाधान देऊन गेलीये. त्यामुळे या निर्णयाचा समाजानेही सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करावा अशी मागणी कोल्हापूरच्या तुरुंग अधिक्षक स्वाती साठे यांनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा