पावसासाठी पर्जन्ययज्ञ करायला हवा, शंकराचार्यांचा सल्ला

June 15, 2016 6:30 PM0 commentsViews:

Shankarachya212

15 जून : जूनचा पहिला पंधरवडा संपला तरी राज्यात अजून पावसाचे आगमन झालेले नाही. शेतकर्‍यांसह सर्वच जण पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शंकराचार्य नृसिंह भारती यांनी पावसासाठी पर्जन्ययज्ञ करण्याचा सल्ला दिला आहे.

भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादमध्ये संत परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शंकराचार्य नृसिंह भारती बोलत होते. विशेष म्हणजे शंकराचार्यांनी सल्ला दिला त्यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यासारख्या नेत्यांसह राज्यातील वारकरी समुदायही या परिषदेसाठी उपस्थित होता.

राज्यात पाणी वाचवण्याचे आणि जिरवण्याचे अभियान सुरू आहे हे चांगलेच आहे. पण त्याचबरोबर पाऊसही पडला पाहिजे. त्यासाठी पर्जन्ययज्ञ करायला हवा. पाऊस आणि पाणी जिरवणे या दोन्ही संकल्पना हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत. पावसासाठी नामजप आपण करतच आहोत. पण त्याचबरोबर यज्ञ करण्याची जबाबदारीही घेतली पाहिजे, असा सल्ला शंकराचार्य नृसिंह भारती यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार अभियानाचे कौतुकही केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा