छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

June 16, 2016 5:34 PM0 commentsViews:

bhujbal_arrested

मुंबई – 16 जून : आरोग्याच्या कारणास्तव जामीन देण्याची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मागणी मुंबई हायकोर्टाने आज (गुरुवारी) फेटाळली. त्यामुळे भुजबळांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

आपल्या मेडिकल टेस्टचा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट खोटा असल्याचा दावा भुजबळ यांनी गेल्या सुनावणीवेळी केला होता. पण कोर्टाने तो ग्राह्य धरला नाही. वैद्यकीय उपचारांसाठी जामीन द्यावा, अशी परिस्थिती तूर्त नसल्याचं सांगत कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

गेल्या सुनावणीवेळी भुजबळांच्या वतीने ऍड् . अमित देसाई यांनी सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांनी भुजबळांच्या आरोग्याबाबत दिलेला मेडिकल रिपोर्ट कसे खोटे आहेत, हे कोर्टाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. भुजबळांच्या ईसीजी चाचणी अहवालावर 2008 साल लिहिण्यात आलेले आहे. जर भुजबळांना मार्च 2016 मध्ये अटक करण्यात आली, तर त्याचा अहवाल हा 2008 मध्ये कसा काय दिला जाऊ शकतो. शिवाय त्यांच्या रक्ताच्या चाचणीच्या अहवालावर त्यांचे नाव पेनने लिहिण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या जन्मतारखेत, अटक झाल्यानंतर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारादरम्यांच्या तारखाही चुकीच्या असल्याचे देसाई यांनी कोर्टाला दाखवून देत हा रिपोर्ट खोटा असल्याचा दावा केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close